सोलापूर : पत्नीस लाथाबुक्याने मारहाण करून धातूची डाळ घोटण्याची रवी गॅस शेगडीवर गरम करून तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर तसेच दोन्ही हातास ठिक-ठिकाणी चटके देऊन गंभीर जखमी करण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडलाय. ही घटना अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगरात गुरुवारी, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीविरूध्द गुन्हा दाखल झालाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगरातील रहिवासी विरभद्र मल्लीकार्जुन बदोले याने त्याची पत्नी सौ. श्रृती (वय-२५ वर्षे) हिच्याशी तक्रार करून मारहाण करून दमदाटी केली. या मारहाणीत ॲल्युमिनियम धातूची डाळ घोटण्याची रवी गॅस शेगडीवर तापवून तिच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि दोन्ही हातावर ठीक ठिकाणी अमानुषपणे चटके दिले.
१८ ऑक्टोबरच्या रात्री सौ. श्रृतीची बहिण, वडील श्रृतीला घेऊन पती विरभद्र बदोले याच्याविरूध्द तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले. जखमी अवस्थेतील श्रृतीला, पोलीसांनी उपाचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल येथे पाठविले.
त्यांनतर सौ. श्रृतीला बरे वाटत असल्याने २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये विरभद्र बदोलेविरूध्द पत्नीस शिवीगाळ, दमदाटी, हाताने व लाथाबुक्याने मारहाण व दमदाटी करून अल्युमिनियम धातूची डाळ घोटण्याची रवी गॅस शेगडीवर गरम करून फिर्यादीचे चेहऱ्यावर गळयावर तसेच दोन्ही हातास ठिकठिकाणी चटके देऊन फिर्यादीस गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार नवले या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.