Type Here to Get Search Results !

निमित्त " पोलीस स्मृति दिन" ! पोलीस मुख्यालयात शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली; कुटुंबियांचीही उपस्थिती


सोलापूर : येथील पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, पोलीस प्रशिक्षण केंद्र केगांव सोलापूर, रा. रा. पोलीस बल गट क्रं. १० सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी  " पोलीस स्मृति दिन " साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी तसेच शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीही आवर्जून उपस्थित राहून पोलीस स्मृति स्तंभास पुष्पचक्र अर्पित करून श्रद्धांजली अर्पित केली.


हिमालय पर्वतरांगाच्या बर्फाळ प्रदेशातील भारत-तिबेट सरहद्दीच्या संरक्षणाची जबाबदारी सी.आर.पी.एफ. चे जवान पार पाडीत होते. या सरहद्दीच्या लडाख भागात १८,००० फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणी २१ ऑक्टोबर, १९५९ रोजी पोलीस तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना अचानक चिनी फौजांनी गोळीबार केला, त्यामध्ये १० जवानांना विरगती प्राप्त झाली होती. तेव्हा पासून २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर " पोलीस स्मृती दिन " म्हणून पाळण्यात येतो.


०१ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत देशामध्ये पोलीस दलातील २१६ पोलीस अधिकारी व जवान हे आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करुन सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी भावपूर्ण वातावरणात त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायालय (सोलापूर) प्रमुख जिल्हा न्यायाधिश मो. सलमान आझमी, या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सुरवातीस मो. सलमान आझमी यांनी '२१ ऑक्टोबर पोलीस स्मृतीदिन' संदेशाचे वाचन केले. तसेच यावेळी वर्षभरात संपूर्ण देशात आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणाची आहूती देऊन हौतात्म्य प्राप्त झालेले २१६ पोलीस अधिकारी व जवान यांचे नावाचे स्मरण/वाचन सहायक पोलीस आयुक्त (वाहतुक विभाग) खिरडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी करुन शोक शस्त्राव्दारे मानवंदना दिली.


यावेळी शहर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक शरद बारावकर  यांनी परेड कमांडर म्हणून तर  S.R.P.F ग्रुप १० पोलीस उप निरीक्षक अंबरनाथ कड आणि  सोलापूर ग्रामीण पोलीस उप निरीक्षक मोरे यांनी प्लाटून कमांडर म्हणून काम पाहिले.



याप्रसंगी पोलीस मुख्यालय सोलापूर शहर, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण आणि एस आर पी एफ बल गट क्रं १० कडील वाद्यवृंद पथक देखील उपस्थित होते. पोलीस स्मृती स्तंभास आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मो. सलमान आझम (प्रमुख जिल्हा न्यायाधिश, जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर), एम. राज कुमार (पोलीस आयुक्त, सोलापूर शहर), अतुल कुलकर्णी (पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण), पंकज अतुलकर (समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्रमांक १० सोलापूर), विजयकुमार चव्हाण (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र केगांव, सोलापूर ), अजित बोऱ्हाडे (पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय), विजय कबाडे (पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ),  डॉ. दिपाली काळे (पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/विशा), प्रितम यावलकर (अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण), तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), सपोआ विभाग-१, सपोआ विभाग-२, सपोआ वाहतुक विभाग, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी/अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.


मुंबई शहरावर सन २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले दिवंगत पोशि/राहुल शिंदे यांचे वडिल सुभाष शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली अर्पित केली. तसेच आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीसांचे कुटूंबिय व इतर विभागातील अधिकारी व नागरिक यांनी देखील पोलीस स्मृती स्तंभास पुष्प अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.