जास्तीत-जास्त महिला लाभार्थ्यांनी सोहळ्याला राहावं उपस्थित : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मंगळवारी, 8 ऑक्टोबर रोजी होम मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थी उपस्थित राहावेत, यासाठी साडेतीनशे पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधित महिला लाभार्थ्यांनी या सोहळयाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राहणार आहे. मंगळवारी, 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे दुपारी 12:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
होम मैदान येथील कामांची पाहणी- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होम मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली.
येथे 40 हजार महिला लाभार्थी बसू शकतील असा सभा मंडप तयार करण्यात येत आहे, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल हे लावण्यात येणार आहेत, या कामाची प्रत्यक्ष पाहणी तसेच आवश्यक सूचना त्यांनी यावेळी संबंधित शासकीय यंत्रणा व गुत्तेदार यांना दिल्या.
तसेच प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या बसेससाठी व अन्य वाहनांसाठी पोलीस विभागाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी तयार केलेल्या पार्किंगची माहिती ही त्यांनी घेतली. एकाही महिला लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्याचा आढावा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस उप आयुक्त दिपाली काळे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सदाशिव पडदूने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.