पिंक ई रिक्षा योजना जिल्ह्यातील सर्व मोठ्या शहरासाठी लागू

shivrajya patra

                                                            (प्रतिकात्मक छायाचित्र)

 सुधारित शासन निर्णयानुसार जिल्ह्याला 200 ऐवजी 600 ई पिंक रिक्षा लाभार्थी उद्दिष्ट

 सोलापूर : महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय  8 जुलै, 2024 अन्वये महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच, महिला व मुली यांचा सुरक्षित प्रवास होणे, यासाठी "पिंक (गुलाबी) ई-रिक्षा" ही योजना सुरु केली आहे.

योजनेच्या सुधारीत शासन निर्णयानुसार ही योजना  फक्त सोलापूर शहरासाठी मर्यादित न ठेवता ही योजना सोलापूर जिल्ह्यातील सर्व मोठ्या शहरासाठी लागू केली आहे. तसेच जिल्ह्यासाठी निश्चित केलेली लाभार्थी संख्या 200ऐवजी 600 केलेली आहे. या योजनेनुसार 70% कर्ज बैंक मार्फत उपलब्ध करुन दिले जाणार असून राज्य शासन 20% आर्थिक भार उचलणार आहे व 10% रक्कम लाभार्थि यांना भरावयाची आहे.

पिंक ई-रिक्षा हा महिलांनीच चालवायचा आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मोठ्या शहरातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.

योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे आहे.

1. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावे.

2. अर्जदार महिलेचे वय 20-40 वर्षे दरम्यान असावे.

3. अर्जदार महिलेचे बैंक खाते असावे. 

4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.3.00 लाखापेक्षा जास्त नसावे. इत्यादी

तरी ईच्छुक पात्र महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सी.एस.नं. 1608/09, प्लॉट नं.12 पहिला मजला, शोभा नगर, सात रस्ता, बिग बझार च्या पाठीमागे, सोलापूर येथे अर्जाचा नमूना व अधिक माहिती साठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सोलापूर यांचे मार्फत करण्यात येत आहे.

 

To Top