मुंबई : माजी आमदार आणि अजित पवार गटात नुकतेच सामील झालेले बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या झालीय. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता. उपचारासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
राजधानी मुंबई एकीकडे शिवसेनेचे दसरा मेळावे सुरू होते. त्याच दरम्यान, वांद्रे परिसरात ही खळबळजनक घटना घडलीय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारानं परिसर हादरलाय.
या गोळीबारात सिद्दीकी जखमी झाले. बाबा सिद्दीकी यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबार कोणी केला याची विश्वसनीय माहिती अद्याप पुढं आलेली नाही. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला.
काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसने कारवाई केली होती. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पण आता काँग्रेसने त्यांना पदावरून हटवलंय.
बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडलीय. घटनास्थळी निर्मलनगर पोलीस पोहोचले असून तपास करीत आहेत.