सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कासेगांव येथील माजी सैनिक संभाजीराव जनार्दन वाडकर यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त त्यांचे चिरंजीव महेश वाडकर यांनी विजयादशमी च्या शुभमुहूर्तावर शनिवारी, एका छोटेखानी कार्यक्रमात माननीय श्री संभाजीराव वाडकर सार्वजनिक वाचनालयाचा प्रारंभ केला.
आजच्या संगणकीय क्रांती अन् मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चाललीय असं नेहमीचं म्हटलं जातं. समाजात पुस्तक-ग्रंथांकडं एक चांगला मित्र म्हणून पाहणारा वर्ग वृद्धिंगत व्हावा तसेच वाचन संस्कृती वाढीस लागावी, या उदात्त हेतुने विजयादशमीला वडिलांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त माननीय श्री संभाजीराव वाडकर सार्वजनिक वाचनालयाचं उध्दाटन केले.
संस्थेसाठी तन-मन-धनाने काम करीत असलेल्या अजित जाधव, गणेश वाडकर, महादेव माळी, शिवदास वाडकर, राजाभाऊ वाडकर यांच्यासह सर्व संचालक मंडळानं अनेक अडथळ्यावर मात करून हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करून दाखवला, यासाठी महेश वाडकर यांनी सर्वांचं व्यक्त करताना, येत्या काळात कासेगांवातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व व्यायाम शाळा (जिम) उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे संस्थेचे अध्यक्ष महेश वाडकर यांनी यावेळी सांगितले.