संघर्ष कामगार संघटनेची सी. बी. आय. चौकशीची मागणी
सोलापूर : बांधकाम कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वाटप करण्यात येत असलेलं गृहोपयोगी संच वाटप संशयाच्या धुक्यात सापडलंय. मे. मफतलाल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी टोकन पध्दतीच्या नावाखाली एक हजार रुपये घेत असून या वाटप पध्दतीची सी. बी. आय. चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केलीय.
मे. मफतलाल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी बेकायदेशीरपणे शिबिर घेणे, टोकन वाटपाच्या नांवाखाली कामगारांकडून प्रति गृहोपयोगी संचासाठी कंपनीचे कर्मचारी एक हजार रूपये घेतात. त्याकडे सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर हे गृहोपयोगी संच वाटपाबाबत आमच्या कार्यालयाचा व कर्मचाऱ्यांचा कोणताही संबंध नाही, असे आश्याचे बोर्ड कार्यालयामध्ये लावलेले आहेत, मात्र हे कार्यालय कंपनीचे बिल कार्यालयामार्फत काढतात, याचा अर्थ असा की, या गोष्टीकडे सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड हे डोळे झाकून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलाय.
गृहोपयोगी साहित्य वाटपाच्या शासकीय परिपत्रकामध्ये कोठेही टोकन प्रक्रिया वाटप करून गृहोपयोगी संच वाटप करा असं नमूद नाही, मात्र याची अंमलबजावणी 'आंधळं दळंत आणि कुत्रा पीठ खातं' अशी झाली आहे.
याकरिता मे. मफतलाल कंपनीची सी. बी. आय. चौकशी झाली पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद पुनम गेटसमोर लाक्षणिक आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आलंय.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव, केदार देवकुळे, आनंद शेळके, नाजुका लोखंडे, गौरी चव्हाण, सतीश आसादे, राणी शिंदे, मनिषा क्षिरसागर इत्यादी हजर होते.