सोलापूर : ऑफिसचे गेटवर उभे राहून लोको पायलटला इच्छापूर्वक कर्तव्यावर जाण्यास अटकाव केल्यानं भारतीय रेल्वेचं सुमारे ४५ लाख रुपयांहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय. हा खळबळजनक प्रकार येथील रेल्वे स्थानकात गुरुवारी, १९ सप्टेंबरच्या पहाटेपूर्वी घडलाय. याप्रकरणी सेवानिवृत्त लोको पायलटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सेवानिवृत्त लोको पायलट एस. जे. निगडे (रा. सोलापूर) यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थांबून कर्तव्य बजावण्यास जात असलेल्या लोको पायलटला धमकावून कर्तव्यास न जाण्यास प्रवृत्त केले. हा प्रकार बुधवारी दुपारी पासून सुरू झाला होता. त्यामुळे रेल्वेच्या १३ गाड्यांच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. ज्यामुळे भारतीय रेल्वेचे ४५,०१,४७० रुपयांचे आर्थिक नुकसान केले, असल्याची फिर्याद रविंद्रनाथ प्रभुदास राय (वय- ४८ वर्षे, व्यवसाय- नोकरी, रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म : नं.०१, कर्मीदल चालक, एवं परिचाल लॉबी, सोलापूर) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार सेवानिवृत्त लोको पायलट एस. जे. निगडे (रा. सोलापूर) याच्याविरुध्द लोको पायलटला धमकावून कर्तव्यास न जाण्यास प्रवृत्त केले व कर्तव्य करण्यापासून धाकाने परावृत्त करून रेल्वेचे जे ४५ लाख रुपयांहून अधिकचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.