Type Here to Get Search Results !

... आठवड्यातील लक्षवेधी कारवाई; बोगस खत गोदामावर धाड


शेतकऱ्यांच्या 'अन्ना' त 'माती' कालवण्याचा सुरू होता उद्योग

सोलापूर : पोलीस, कृषि आणि गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यात २० मॅट्रीक टन बनावट रासायनिक खताचा संशयास्पद साठा आढळलाय. तामलवाडी हद्दीत शुक्रवारी, 26 जुलै रोजी सायंकाळी हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात पाच लाख रुपयांहून अधिक किंमतीची ४०० पोती आढळली. शेतकऱ्यांच्या 'अन्ना' त 'माती' कालवण्याचा उद्योग केल्याप्रकरणी महादेव उर्फ बालाजी लक्ष्मण चौगुले आणि परप्रांतीय कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्याकडं संपलेल्या आठवड्यातील लक्षवेधी कारवाई म्हणून पाहिलं जातंय.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने आणि अन्य अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, २६ जुलै रोजी धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरील तामलवाडी येथील सोलापूर-धुळे महामार्गावर जयकिसान कृषि केंद्र पासून अवघ्या ३०० मिटर अंतरावर असलेल्या अंतरावर असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी तेथे पांडूरंग खंडू खारे हजर होते, जे जयकिसान कृषि केंद्राचे मॅनेजर म्हणून काम पहात असल्याचे चौकशीत पुढं आले.

या अधिकाऱ्यांनी स्वतःची ओळख करुन दिली, त्यांचा येण्याचा उद्देश समजावून सांगितला. त्यानंतर या पथकाने गोडाऊनची झाडाझडती घेऊन सर्व उत्पादनाची माहिती मॅनेजर खारे यांच्याकडून घेतली. त्या गोडाऊनमध्ये उर्वरक किसान गोल्ड फर्टिलाईझर N:P:K 10:26:26 Manufactured By Krushi Chemical & Fertilizers, Plot No. 36 Lemon Street Rajkot निदर्शनास आले. 

त्यानुसार गोडावूनचे मालक महादेव लक्ष्मण चौगुले यांना फोनद्वारे या खताच्या परवानाबाबत विचारणा केली असता, उर्वरक किसान गोल्ड फर्टिलाईझर N:P:K 10:26:26 Manufactured By Krushi Chemical & Fertilizers, Plot No. 36 Lemon Street Rajkot यांना परवाना नसल्याचे सांगितले. त्यानुसार गोडाऊन मध्ये परवाना नसलेला अनाधिकृत रासायनिक खत साठा आढळून आला. 

                                                  (फाईल फोटो)

साठ्याचे वर्णन पुढील प्रमाणे उर्वरक किसान गोल्ड फर्टिलाईझरचे ४०० पोते ( २० मे. टन) खत आढळले. त्याची किंमत अंदाजे ५, ८८, ००० रुपयांहून अधिक आहे. ते विक्रीसाठी आणलेले विनापरवाना अनाधिकृत खत निदर्शनास आले. त्या खत साठ्यामधुन खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये नमुद तरतुदीनुसार खताच्या विश्लेषणासाठी ०३ प्रतीत नमुने पंचासमक्ष खत चाचणी प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर यांचे कडे तपासणी साठी पाठविण्याकरीता प्रविण विठ्ठल भोर (तंत्र अधिकारी (गु. नि.), विभागीय कृषि सह संचालक कार्यालय, लातूर यांनी घेतले. 

तो खत साठा जप्त करुन त्याच गोडाऊनमध्ये पांडूरंग खंडू खारे यांच्या ताब्यात देऊन, साठा कोठेही हालवू नये किंवा विक्री करु नये, अशी सर्वासमक्ष जाणीव करुन दिली, तसा जप्ती पंचनामा पंचासमक्ष केला. जय किसान कृषि केंद्र मॅनेजर पांडूरंग खंडू खारे यांच्या घेण्यात आलेल्या जबाबानुसार पत्र्याच्या गोडाऊनचे मालक महादेव लक्ष्मण चौगुले हे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावरून खत निरिक्षण निरिक्षक कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रविण विठ्ठलराव पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून तामलवाडी पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश खंड ५, ६, ७, ८, ११, १९ (सी), २१, २५ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे खंड ३ (२), (अ), ३ (२), (डी), ७, ९ सह भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३) अन्वये महादेव लक्ष्मण चौगुले (रा. कासेगांव) व Krushi Chemical & Fertilizers, Plot No. 36 Lemon Street Rajkot या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

ही कारवाई साहेबराव दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, मोहीम अधिकारी डी. ए. गरगडे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तुळजापूर कृषी अधिकारी सतीश पिंपरकर उपस्थित होते. याकामी तंत्र अधिकारी गुण नियंत्रण कार्यालय लातूरचे प्रविण विठ्ठल भोर यांनी मार्गदर्शन केले.

.... हे आहेत महादेव चौगुले !

दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी पुत्र महादेव उपाख्य बालाजी लक्ष्मण चौगुले, त्या गांवातील प्रगतशील शेतकरी व द्राक्ष उत्पादक असा त्यांचा लौकिक आहे. त्यांनी शेती करता-करता कृषिसाठी लागणारी औषध, किटकनाशके, खते विक्रीचं गांवात कृषि केंद्र सुरु केले. प्रारंभी विक्रेता म्हणून सुरू झालेला व्यवसाय बनावट खते वा कृषि औषधे साठ्यापर्यंत व्याप्ती वाढविण्यात महादेव चौगुले यांना यश आल्याचे दिसतंय. 

द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक म्हणूनही महादेव उपाख्य बालाजी चौगुले यांचं मार्केटमध्ये नांव आहे. त्यांच्याविरुध्द बोगस खत साठाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.