Type Here to Get Search Results !

''... त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही." राज ठाकरेंचं रोखठोक मत

 

सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यानिमित्तानं त्यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. याच दरम्यान त्यांनी आरक्षणाबद्दल सुस्पष्ट भूमिका मांडलीय. "महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही." रोखठोक मत त्यांनी वार्तालापप्रसंगी व्यक्त केलंय.

महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मला असं वाटतं की, यामध्ये जात येते कुठे ? असा सवाल करुन महाराष्ट्रातील आपल्या मुला-मुलींना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की, देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपण बघतोय. बाहेरच्या राज्यातील मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकवतात, असं सांगून त्यांची परप्रांतीयासंबंधीही राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, "खासगी संस्थांमध्ये आरक्षण आहे का? नेमकं किती मुलांना आरक्षण मिळणार आहे. हे आपण तपासणार आहोत का? असे प्रतिसवाल उपस्थित करून, माथी भडकवायची, हे सर्व जे राजकारण सुरू आहे, ते कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सुरू आहे. मतांसाठी राजकारण सुरू आहे. मुला-मुलींच्या विचार करत नाही. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत, हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे" असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. 

"बाहेरच्या राज्यातील मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकवतात. आपल्या राज्यातील शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतात. सर्व गोष्टी पैशावर येतात. मूळ विषय बाजुला राहतो आणि आपण भरकटतो. हे भरकटणं नाही तर विष कालवणं आहे. लहान मुलं जातीवर बोलतात. महाराष्ट्रात असं कधीच नव्हतं. ज्या राज्याने देशाला दिशा दिली, ते जाती-पातीत खीतपत पडलंय." अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केलीय.

"सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टींमुळे डोकं फिरलं आहे. महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवारांनी घेतली पाहिजे, असं सांगून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते पवार यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडलंय. 

माझी २००९ ची भाषणं काढून पाहा, त्यावेळी कोणी मला साथ दिली नाही. राजीव गांधींनंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं आहे. मला जातीतील काही कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही, महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही, असंही राज ठाकरे यांनी ठासून सांगितलं.

"यूपीमध्ये महाराष्ट्रातील नोकरीच्या जाहिराती येतात, पण महाराष्ट्रात येत नाहीत. म्हणजे काय? इथे नोकऱ्या आहेत हे माझ्या महाराष्ट्रातील पोरांना कळत नाही. आता बेरोजगारांची यादी देखील येत नाही. सर्वच गोष्टी बंद झाल्या. मी नेहमीच म्हणतो, महाराष्ट्रातल्या मुला-मुलींना प्राधान्य द्या. मोदींनी प्रत्येक राज्य समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. अजून मी बोलायला सुरुवात केली नाही. योग्य वेळी योग्य गोष्ट करावी" असं देखील राज ठाकरे यांनी शेवटी म्हटलंय.