सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगांव-कासेगांव रस्त्यावरील महावितरणची नव्या मेन लाईन ओढण्याच्या कामात कासेगांव रस्त्यावरील लिंबाच्या २०-२५ झाडांवर कुऱ्हाड चाललीय. त्यातच गुरवांचं लवण अशी ख्याती असलेल्या नाल्याजवळील ५ पिढ्यांचा साक्षीदार असलेल्या वडाच्या झाडावर कटर चालवून त्यास ' बोडकं ' करण्यात आलंय. हा प्रकार महावितरणचा शॉक म्हणून पाहिला जातोय.
पर्यावरण संतुलनासाठी 'झाडं लावा, झाडं जगवा' हा संदेश जनमाणसांना देण्यासाठी शासन लाखो रुपयांचा चुराडा करतं, या जाहिरातबाजीनंतर किती झाडं लावली जातात, त्यातील किती वाढतात अन् पर्यावरण संतुलनाला हातभार लावण्यास सक्षम होतात, हा संशोधनाचा विषय असू शकतो.
गुरवाच्या लवणातील वडाचं झाडं आजच्या पिढीनं आजोबाला विचारलं तरी मी बघतोय, तेव्हापासून हाय, असं सांगणारी पिढी आता वाकलीय, पण ते झाडं वाढत्या वयातही ताठ मानेने उभं होतं, त्याच्या मोठ-मोठ्या तीन फांद्या आज कापण्यात आल्यात, कालपर्यंत हिरव्या गर्द पानांनी बहारलेल्या झाडाची तीचं पानं उद्या पाचोळ्यात दिसतील.
हे झाड कापताना कालच्या शब्दात परवानगी अन् आजच्या शब्दात 'परमिशन' देण्यात आलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचं अभिनंदन (?) झालं पाहिजे का असा प्रश्न पुढं येतोय. तसंच अन्य झाडांबरोबर ५ पिढ्याचा मूक साक्षीदार असलेलं वडाचं झाडं विनापरवाना कापलं गेलं असल्यास जिल्हा प्रशासनानं स्वतः तक्रारदार होऊन मनमानी केलेल्या मंडळीवर कारवाईसाठी पुढं यावं, तरच ' झाडं लावा, झाडं जगवा ' या घोषवाक्याला अर्थ राहणार आहे, असं वाटतंय.