Type Here to Get Search Results !

रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी करणार सलग १० तास १० मिनिट १० सेकंद लाठी फिरवण्याचा विश्वविक्रम


सोलापूर : स्वातंत्र्य सैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान, सोलापूर संचलित रूद्रशक्ती गुरुकलची विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळीअंगडी ही रविवारी, ११ ऑगस्ट रोजी सलग १० तास १० मिनिट १० सेकंद लाठी फिरविण्याचा विश्वविक्रम करणार आहे. या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशन एक्सलेंस रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये होणार आहे.

हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवार, ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. सृष्टी बिळीअंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणे या पारंपरिक व ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करत आहे. 

रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन हे मार्गदर्शन करत आहेत. १३ वर्षाच्या सृष्टीने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय लाटीकाठीची स्पर्धा व त्याचबरोबर कराटे, योंगमुडो स्पर्धा खेळून विशेष प्राविण्य मिळवले आहे.

सध्या सृष्टीचा सलग लाठी फिरवण्याचा सराव लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षणस्थळी योगिनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरु आहे. सद्यस्थितीला ती अकरा तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करत आहे. इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नावलौकिकमध्ये भर घालणाऱ्या विश्वविक्रमाची अत्यंत जोमात तयारी करत आहे.

विश्वविक्रमाबद्दल सृष्टी म्हणते की, महाराष्ट्र हा जिजाऊंच्या लेकी व छत्रपती शिवाजी महाराज, अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीतील मुली व महिला सक्षम व्हाव्यात. हा संदेश घेऊन शिवकालीन लाठी फिरविण्याच्या माध्यमाद्वारे सलग १० तास १० मिनिट १० सेकंदाचा विश्वविक्रम ११ ऑगस्ट रोजी करणार आहे. जेणेकरून मला पाहून अनेक मुली लाठीकाठी त्याचबरोबर शिवकालीन मर्दानी खेळाकडे आकर्षित होतील व नवीन पिढी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडेल, असा सृष्टीला विश्वास आहे. या विश्व विक्रमासाठी रुद्रशक्तीचे गुरुकुलचे विद्यार्थी सहकार्य करणार आहेत. 

हा कार्यक्रम सरस्वती चौक येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे असणार आहे. विक्रमाची नोंद वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ अशी आहे. सायंकाळी ६ वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे, माजी महापौर महेश कोठे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.