Type Here to Get Search Results !

स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून ७६ रक्तदात्यांचे लोकरत्न कै. श्रीकांत वाडकर यांना अभिवादन


आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

 सोलापूर : कासेगांवचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर याच्या ६५ व्या जयंतीदिनी रविवारी, ११ ऑगस्ट रोजी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून ७६ रक्तदात्यांनी लोकरत्न कै. श्रीकांत वाडकर यांना अभिवादन केले. त्यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत कासेगांव येथे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.



सकाळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचे उद्घाटन लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले. दिलीप चौगुले, असलम तांबोळी, निशिकांत पाटील, सरकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ७६ रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य पार पाडले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.



सायंकाळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. गावात अनेक ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या प्रारंभी आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व लोकरत्न कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या गांव भेटीत आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते यावेळी लहुजी शक्ती चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या व्यासपीठावरील  उपस्थित मान्यवरांचा लोकरत्न असणाऱ्या कासेगाव व पंचक्रोशीतील अनेक गावातून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.



सरपंच यशपाल वाडकर यांनी आपल्या मनोगतात कासेगांवसाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांचं आभार मानले व उर्वरित विकास कामांच्या मागण्यांचे निवेदन केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.



व्यासपीठावर सिद्धाराम हेले, श्रीमंत हक्के, मधुकर चिवरे, सिताराम कदम, नेताजी खंडागळे, बालाजी कवडे, प्रशांत जाधव, आबा भागवत, भारत चिवरे, मनोज गुंड, वैभव हलसगे, दत्तात्रय खंडागळे, बब्रुवान खंडागळे, ज्ञानेश्वर रोकडे, राजाराम चौगुले, नेताजी पाटील, मल्लिनाथ येणगुरे, लक्ष्मण वाडकर, संभाजी चौगुले, प्रकाश हेडे, जालिंदर गायकवाड, शहाजहान शेख, नारायण जाधव, केदार ढेकळे, राजश्री येणगुरे आदींची उपस्थिती होती. 

.... चौकट ....

कासेगांवकडे विशेष लक्ष : आमदार कल्याणशेट्टी

रस्ते, इमारती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सिंचन आदी विविध विभागाच्या मिळून तब्बल १० कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले आहे. आगामी निविदा प्रक्रियेत असणाऱ्या २० कोटी रुपयांच्या कामांची घोषणा करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कासेगांवकडे विशेष लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.