Type Here to Get Search Results !

देशाच्या प्रगतीसाठी मूल्याधिष्ठित शिक्षण महत्त्वाचे : प्रा. राजीव कुमार


एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिन दिमाखात साजरा 

सोलापूर : एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रदान करण्यासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आदर्श जीवन मूल्याची रुजवात करत आहे. विद्यापीठाचे ध्येय आणि प्रगतीचा आढावा घेऊन भविष्यात विद्यापीठ अधिक उंची गाठेल आणि समाजाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान देईल. मूल्याधिष्ठित शिक्षण महत्त्वाचे आहे असे गौरवोद्गार ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन मेंबर सेक्रेटरी प्रा. राजीव कुमार यांनी काढले.

केगांव येथील एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवारी दुपारी मोठया थाटात अन् दिमाखात पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या जॉईंट ट्रस्टी डॉ. सुचित्रा कराड - नागरे या होत्या.


यावेळी व्यासपीठावर माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे बोर्ड ट्रस्टी डॉ. विनायक घैसास , आयआयएम नागपूरचे संचालक  प्रा. भीमराया मेत्री, प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, संकल्प सेमीकंडक्टर संस्थापक विवेक पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. राजीव कुमार यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, एम आई टी विश्वप्रयाग विद्यापीठाचे ध्येय समाजाला काहीतरी देणे आणि आपल्या मुल्यांशी जोडून राहणे हे आहे. विद्यापीठाचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड यांनी आपले उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूरमध्ये पूर्ण केले होते.


या विद्यापीठाच्या निर्मितीतून संस्थेचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड व कार्यकारी अध्यक्ष प्रा. स्वाती कराड-चाटे आपल्या जन्मभूमीशी जोडलेले राहून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे विद्यापीठ केवळ शैक्षणिक शिक्षण देत नाही तर मूल्य शिक्षणही देत आहे. आदर्श जीवन मूल्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची शिकवण हे विद्यापीठ देत आहे. भारतीय संस्कृतीही रुजवली जाते. 

विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रदान करण्यासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यापीठाचे ध्येय आणि प्रगतीचा आढावा घेऊन भविष्यात विद्यापीठ अधिक उंची गाठेल आणि समाजाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान देईल. उच्च शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,असे त्यांनी सांगितले.


अध्यक्षीय भाषणात जॉईंट ट्रस्टी डॉ. सुचित्रा कराड - नागरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा मांडला. संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड यांचा कार्य प्रवास सांगितला. त्या पुढे म्हणाल्या, एका इंजिनिअरिंग कॉलेजपासून सुरू झालेला हा प्रवास विद्यापीठापर्यंत पोहोचला आहे, हे विद्यापीठ पाचवे विद्यापीठ आहे. 

ग्रामीण भागामध्ये संस्था निघाल्या पाहिजे, हा उद्देश ठेवला. सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवला. या विद्यापीठातून विद्यार्थी सुजाण नागरिक म्हणूनच बाहेर पडतील, असा विश्वास व्यक्त केला. थोर विचारांच्या मान्यवरांनी ही संस्था उभा केली ते लक्षात घेऊन वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. गोपालकृष्ण जोशी यांनी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या उद्दिष्टे आणि प्रगतीचा आढावा घेतला. विद्यापीठ उद्दिष्ट केंद्रीत शिक्षण, उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार तयार केलेले अभ्यासक्रम आणि राष्ट्रीय शिक्षा धोरण यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एम आई टी विश्वप्रयाग विद्यापीठ ,मिलर्सविले विद्यापीठ, इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलविया या विदेशी विद्यापीठांशी संलग्नपणे व तसेच कोर्सेरा, इन्फोसिस, स्प्रिंगबोर्ड, सिस्को या ऑनलाईन कोर्सेस प्लॅटफॉर्मशी सहकार्य करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. 

विद्यापीठातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना अर्थ सोल्युशन, इव्या सोलेशन आणि ॲप्पटेले (Apptelay) या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यापीठाने 2.5 हेक्टर क्षेत्रफळावर मियावाकी वन तयार केले असून पुढील तीन वर्षांमध्ये ५० हजार  वृक्षरोपण  करण्याचा निश्चय केला आहे. विद्यापीठात डिझाईन थिंकिंग फॉर सस्टेनेबिलीटी ( Design Thinking for Sustainability) आणि कैवल्य धाम या संस्थेच्या सहकार्याने  वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत, असे सांगितले.

स्वागतपर भाषणात प्रकल्प संचालिका प्रा. प्रभा कासलीवाल म्हणाल्या, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी सोलापूर येथे विद्यापीठ स्थापनेत प्रमुख भूमिका बजावली आहे. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ आता सोलापुर शहरातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण प्रदान करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

याप्रसंगी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. विश्वशांती प्रार्थनेने  कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रा. ट्विंकल शुक्ला यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्राणेश मुरनाळ यांनी आभार मानले. यावेळी विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-- चौकट ---

देश प्रगत आणि विश्वगुरू होण्यासाठी 

कष्ट महत्वाचे : डॉ. सुचित्रा कराड - नागरे

देशाच्या जडणघडणीमध्ये विद्यार्थी हे महत्त्वाचे आहे. महात्मा बसवेश्वर यांच्यासह महापुरुषांच्या आदर्श विचारांची कास धरून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. केवळ प्रगत आणि विश्वगुरू म्हणून चालणार नाही. त्यासाठी कष्ट करण्याची गरज आहे. विद्यार्थी व पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांचे कला व छंद जाणून घेऊन त्यांचे करिअर घडविले पाहिजे. शिक्षणाबरोबर छंदही महत्त्वाचे आहेत,असे आवाहन जॉईंट ट्रस्टी डॉ. सुचित्रा कराड - नागरे यांनी केले. 

-- चौकट ---

ऑपरेशन वसंता आणि चारचाकी 

फिरत्या इनोवेशन लॅबचे उद्घाटन

यावेळी अगस्त्य फाउंडेशन आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या सहकार्याने इनोवेशन लॅब, दुचाकी प्रयोगशाळा, ऑपरेशन वसंता आणि चारचाकी फिरते इनोवेशन लॅब या उपक्रमाचे ध्वज फडकावुन उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, अगस्त्य फाउंडेशनचे नितीन देसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली.