शासनाच्या सर्व महत्वपूर्ण योजनांची जबाबदारी महसूल विभागावरच असते : निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार
यावेळी शेखर गायकवाड लिखित "रंग महसुली" या पुस्तकाचे प्रकाशन
महसूल पंधरवडा सांगता समारंभ व कौतुक सोहळा संपन्न
सोलापूर : शासनाच्या अनेक विभागापैकी महसूल विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाच्या सर्वसामान्य लोकांशी दैनंदिन संबंध येतात. तसेच प्रशासकीय स्तरावर महसूल विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने सर्व यंत्रणाच्या समन्वयाचे काम येते. त्यामुळे अशा विभागात काम करत असताना माणसे वाचता आली पाहिजेत. कामाचा आनंद घेता आला पाहिजे. जो अधिकारी कर्मचारी हे काम करेल, त्याची महसूल विभागातील सेवा उत्कृष्ट असेल, असे प्रतिपादन पुणे येथील यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी केले.
महसूल पंधरवडा निमित्त रंगभवन सभागृह येथे आयोजित सांगता समारोप कार्यक्रमात श्री.गायकवाड मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह होत्या. तर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी, महसूल सहायक, अव्वल कारकून, शिपाई, वाहनचालक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ०१ ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवढा सर्व तहसिल कार्यालये उपविभागीय कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून यशदचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड हे सपत्नीक उपस्थित होते.
महसूल पंधरवड्यानिमित्त आयोजित स्वच्छ सुंदर कार्यालय या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात मोहोळ तहसिल कार्यालयाला तहसिल स्तरावर, उपविभागीय अधिकारी कार्यालय, माळशिरस, अकलूज यांना उपविभाग स्तरावर तर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा यांना जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरील सर्व शाखांमध्ये प्रथम क्रमांक देण्यात आला."त्यानंतर सर्वोत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले."
तहसिलदार संवर्गातील सर्वोत्कृष्ट ठरलेले मंगळवेढा तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, उपविभाग माळशिरस तसेच विविध जिल्हास्तरिय विविध संघटनांचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर सोलापुरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी सौजन्याने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वर्तन केले पाहिजे अशा मौलिक सूचना दिल्या.
महसूल विभागातील कर्मचारी/अधिकारी यांच्या 10 वी व 12 वी तील उत्कृष्ट गुण मिळवलेल्या पाल्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी शेखर गायकवाड यांनी आपल्या भाषणातून सर्व उपस्थित महसूली अधिकारी कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महसूल खात्यात काम करताना माणसं वाचता आली पाहिजेत, तसेच कामाचा आनंद घेता आला पाहिजे अन्यथा काम फार एकसुरी होईल, अशा भावना व्यक्त केल्या. आपल्या भाषणामध्ये आपल्या कारकीर्दीतील अनेक किस्से आपल्या खास शैलीमध्ये त्यांनी सांगितले.
.... चौकट ...
"रंग महसुली" पुस्तकाचे प्रकाशन
शेखर गायकवाड लिखित "रंग महसुली" या महसूल खात्यात काम करताना भेटलेल्या बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या लोकांचे किस्से असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे हस्ते करण्यात आले. महसुली अधिकारी यांचे समक्ष पुस्तक प्रकाशन करण्याचा शेखर गायकवाड सरांचा मानस होता, ती संधी सोलापूरच्या महसूल विभागाला मिळाल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला.