सोलापूर : पुणे महामार्गावरील अपघातातील जखमींना रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात NHAI विभागाच्या अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केलीय. रविवारी रात्री हा अपघात घडला. राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढल्यावर त्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता, NHAI कडे रुग्णवाहिका नसल्याचा शब्द कानी आला. या कटू अनुभवावर वैभव गंगणे यांनी नाराजी व्यक्त केलीय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बारामती येथील आयोजित कार्यक्रम आटोपून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह रविवारी रात्री सोलापूरकडे येत असताना बायपास रोडवर एका थांबलेल्या मालवाहतूक वाहनाला रिक्षा चालकाने पाठीमागून धडक दिल्याने झालेला अपघात त्यांच्या निदर्शनास आला.
सुजित अवघडे, वैभव गंगणे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी वेळ न दवडता जखमींना रिक्षातून बाहेर काढले. त्या जखमींना वैद्यकीय उपचार मिळावेत, म्हणून NHAI ची रुग्णवाहिका उपलब्ध होण्याच्या सद्हेतूने संपर्क साधला असता, रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात NHAI विभागाच्या अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केलीय. यावर वैभव गंगणे व सुजित अवघडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
नशीब बलवत्तर म्हणून त्या तिघांचा जीव वाचला, मात्र एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने NHAI विभागाचा निष्काळजीपणा अन् गलथानपणा चव्हाट्यावर आलाय.