Type Here to Get Search Results !

भिशीच्या आडून ०२ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक; गुंतवणुकदारांना चिठ्ठी लिहून आत्महत्येची धमकी



सोलापूर : व्याजापोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे अमिष दाखवून फायनान्सच्या माध्यमातून भिशीच्या आडून गुंतवणुकदारांचा २ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक झालीय. ही घटना श्री ओम साई फायनान्समध्ये नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२४ दरम्यान घडली. पैशासाठी तगादा लावलेल्या गुंतवणूकदारांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकी चिप्पा यानं दिलीय. या प्रकरणी चिप्पा दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे सोलापूर शहरातील गुंतवणूकदारात खळबळ माजलीय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील गीता नगर खुशी रेसिडेन्सीमधील रहिवासी रमेश अंबादास चिप्पा यांनी श्री ओम साई फायनान्समध्ये नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२४ दरम्यान भिशी चालवून लोकांचा विश्वास संपादन केला, तसेच त्यांना जास्तीची  रक्कम व्याजापोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून २,६९,१९,००० रुपयांचा अपहार केला.

रमेश अंबादास चिप्पा आणि सुजाता यांच्याकडं पैशासाठी गुंतवणूकदारांनी तगादा लावल्यावर शिवाजी लक्ष्मण आवार (वय-३७ वर्षे, रा- ३३/३/४७ साईबाबा चौक, सोलापूर) यांना 'मी आत्महत्या करतो व त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहाल' अशी धमकी दिली. चिप्पा यांनी शिवाजी आवार याच्यासह इतर १३१ लोकांचा विश्वासघात करून रुपये २,६९,१९,००० इतक्या रक्कमेची फसवणूक केली.

याप्रकरणी शिवाजी आवार यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांविरुद्ध भादवि ४२०, ४०६, ३४ सह एमपीआयडी अॅक्ट ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.