Type Here to Get Search Results !

काम देण्याच्या निमित्ताने लावलं लगीन ! फसलेल्या महिलेची पोलिसांकडे धाव

             (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : काम देण्याच्या निमित्ताने सलगी करून एका महिलेने, पन्नास हजार रुपये देण्याच्या आमिषाने तिचं खोटं लग्न लावून दिले. हा खळबळ जनक प्रकार इतक्यावरच न थांबता, ती महिला,'तुझ्या लग्नाचे फोटो किंवा तुझ्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल करीन'  अशी धमकी देत असल्याने खोटं लग्न करण्याच्या नादात खऱ्या अर्थाने फसलेल्या महिलेने पोलिसांकडं धाव केलीय. हा खळबळजनक प्रकार २० जून रोजी घडला. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात संगीता क्षिरसागर या आरोपीत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ७० फूट रस्त्यावरील गेंट्याल चौक मल्लय्या स्वामी यांच्या घरी भाड्याने राहणारी रेणुका सिध्दाराम मडके (वय-३२ वर्षे) हिच्या घराशेजारी राहणारी रेखा बिराजदार हिचे ओळखीची संगीता क्षिरसागर (रा. लक्ष्मीनारायण थिएटर, सोलापूर) हिने, 'तुला काम देते, त्याबदल्यात तुला पन्नास हजार रूपये देते पण मी जे काम सांगेन ते कराव लागेल' असे म्हटले.

रेणुकाने त्यास होकार दिल्यावर दुसऱ्या दिवशी, २१ जून २०२४ रोजी सकाळी ११ वा.रेणुका, तिच्या ओळखीची रेखा बिराजदार आणि संगीता क्षिरसागर या तिघी चाळीसगाव येथे गेल्या. तेथे 'तुला प्रविण वाणी या व्यक्तीबरोबर खोटे लग्न करायचे आहे' त्याबदल्यात तुला ५० हजार रूपये देणार असे म्हणून रेणुकाची फसवणूक करून तिचे प्रविण वाणी याच्याशी खोटे लग्न लावून दिले.

या खोट्या-खोट्या लग्नाच्या आडून संगीताने प्रविण वाणी याच्या भावाकडून रोख अडीच लाख रूपये घेतले, मात्र रेणुकाला तिचे ठरलेले ५० हजार रुपये देण्याऐवजी त्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन फसवणूक केली. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.