मस्टर गहाळ झालेल्या ग्रामपंचायतीला टाळे ठोकून होणार आंदोलन
सोलापूर : रोजगार हमी योजनेच्या कामावर घाम गाळलेल्या ११९ मजूरांची मजुरी गेली ४ वर्षे लालफितीत सापडलीय. या मजुरांनी त्यांच्या घामाचं दाम मिळण्यासाठी शासन दरबारी आजपर्यंत पायऱ्या झिजवल्या, मात्र त्यांच्या पदरी निराशा आलीय. या मजुरांना ०१ ऑगस्टपर्यंत मजुरी न मिळाल्यास त्यांनी कासेगांव ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय जाहिर केलाय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कासेगाव शिवारात २०१८ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला सरळीकरण यासह अन्य कामे झाली होती. या कामावर असलेल्या श्रमकार्यांना, त्यांच्या १८ जून २०२० रोजीच्या मस्टरची मजुरी आजपर्यंत मिळालेली नाही. त्या आठवड्यात ११९ मजुरांनी काम केले होते, मात्र त्यांना त्या मस्टरचा पगार मिळाला नाही. तो मिळाला पाहिजे, या मागणीसाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती दक्षिण सोलापूर, तहसीलदार, दक्षिण सोलापूर यांच्याकडे वेळोवेळी अर्ज-विनंत्या केल्या, तरीही या मजुरांच्या पदरी निराशा आली.
या मजुरांनी जिल्हाधिकारी त्यांच्या लोकशाही दिनात ही त्यांची व्यथा मांडली, चौकशी झाली. या चौकशीतून एक भयानक सत्य पुढे आले आहे. या कष्टकऱ्यांनी केलेल्या कामाची नोंद पुस्तिका पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत कासेगाव यांच्या दप्तरातून गहाळ झालीय. ते मस्टर मिळून येत नसल्याचे त्या कामगारांना कळविण्यात आले. त्यांनी केलेल्या कामाची नोंद पुस्तिका सर्वच कार्यालयातून नाहीशी होते, ही अचंबित करणारी बाब आहे.
रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या या ११९ मजुरांचे वेतन त्यांना मिळाले पाहिजे, अशी काही अधिकाऱ्यांची भूमिका असली तरी ते मस्टर उपलब्ध न होणे, ही त्यातील समस्या असल्याचे सांगण्यात येते. या कष्टकऱ्यांनी त्यांच्या घामाचा दाम त्यांना मिळाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेऊन गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यांचा मेहनताना ०१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मिळावा, अन्यथा ज्या ग्रामपंचायतीतून मस्टर गायब झाले, त्या कासेगाव ग्रामपंचायतीला ०२ ऑगस्ट रोजी टाळे ठोकून आंदोलन करण्याचा निर्णय उद्धव नरहरी जाधव, राजकुमार दशरथ वाडकर यांच्यासह अनेक श्रमकार्यांनी घेतलेला आहे.