Type Here to Get Search Results !

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय स्थलांतरणाला कामगार सेनेचा तीव्र विरोध


शासनाचे कामगार मंत्रालय अप्रत्यक्षरित्या मालक धार्जिणे

सोलापूर : सोलापुर शहरातील शहर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय स्थलांतचिंचोली एम.आय.डी.सी येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. त्यास शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार कल्याण सेनेचा तीव्र विरोध राहील, असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी शनिवारी एका निवेदनाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिला.

सोलापूर जिल्ह्यात कंपनी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, खाजगी अस्थापनेतील कामगार विडी कामगार, यंत्रमाग कामगार, हॉटेल कामगार, शिलाई कामगार, वॉचमन कामगार, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार व इतर कामगार लाखोंच्या घरात आहेत. त्यापैकी सोलापूर शहरात विडी यंत्रमाग, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या संपूर्ण जिल्हा परिसरापेक्षा मोठी आहे. यंत्रमाग आणि विडी क्षेत्रात कामगारांची संख्या दीड ते दोन लाखापर्यंत आहेत. या कामागरांच्या समस्या अनेक असून विशेष करून महिला कामगार आहेत. म्हणून त्यांना वारंवार आपल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात जावे लागते.

याकरिता सहाय्यक कामगार कार्यालय सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे व न्यायिक आहे. असे यापुर्वी सहाय्यक कामागर आयुक्त कार्यालय मुस्लिम पाच्छा पेठ येथील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयामध्ये होते. ते कार्यालय अचानकपणे दमाणी नगर येथे स्थलांतरित करण्यात आले. दमाणी नगर कार्यालय हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून सुमारे ०५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे कामगारांना त्यांचे न्याय मिळवून घेण्यासाठी मोठा खर्चिक प्रवास करावा लागत आहे. ते कामगारांसाठी गैरसोयीचे झाले व होत आहे.

सध्या असलेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चिंचोळी एम.आय.डी.सी. येथे स्थलांतरित होत असल्याचे प्रसिध्दी माध्यमातून पुढं आलं आहे. कामगारांसाठी असलेले अनेक शासकीय योजना, हक्क प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर कारखानदारांकडून व मालकांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास जाणे यापुढे कामगारास शक्य नाही. महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्रालय, हे अप्रत्यक्षरित्या मालकांना मदत करण्याचे म्हणजेच मालक धार्जिणे आहेत, असे स्पष्ट दिसून येते. विशेष करून बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे. ती सुध्दा करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. एकूणच शासनाचे कामगारांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न आहे.



या सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय स्थलांतरित न करण्याचे शिफारस सहाय्यक कामगार आयुक्त या नात्याने शासनाकडे करावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आलीय, अन्यथा कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

विष्णु कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात अमित भोसले, शोभा पोला, रेखा आडकी, प्रसाद जगताप, विठ्ठल कुऱ्हाडकर, रमेश चिलवेरी, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळ, शरणप्पा जगले यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे निवेदन माहितीस्तव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह राज्याचे कामगार मंत्री कामगार आयुक्त व अपर कामगार आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आल्या आहेत, असेही कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णु कारमपुरी यांनी सांगितले.

फोटो ओळ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे वतीने सहाय्यक कामगार आयुक्त  कार्यालय स्थलांतरित विषयी तीव्र विरोधाचा निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड यांना देताना, विष्णु कारमपुरी, अमित भोसले, शोभा पोला, रेखा आडकी दिसत आहेत.