Type Here to Get Search Results !

... लोकशाहीत मतदारांची ताकद सर्वांपेक्षा जास्त असते : खासदार प्रणिती शिंदे


सोलापूर : पूर्वी निवडणुका विचारसरणी, तत्वावर लढायचे, पण या निवडणुकीत चारसो पार, धनशक्तीचा वापर, ईडी, सीबीआय, जाती-धर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न झाला. काही जणांनी मॅनेज होऊन केलेला वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न,यासारख्या अनेक गोष्टींचा वापर केला गेला, पण जनतेने लोकशाहीत मतदारांची ताकद सर्वांपेक्षा जास्त असते, हे दाखवून दिले. जनता जनार्दन आमच्यासाठी देव आहेत म्हणून निवडून दिलेल्या देवासमोर कृतज्ञता व्यक्त करते, या शब्दात नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी कृतज्ञता भाव व्यक्त केला.



सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे ह्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे, महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी रविवारी, ७ जुलै रोजी अक्कलकोट रस्त्यावरील कै. राजमल बोमड्याल मंगल कार्यालयात कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खा. प्रणिती शिंदे बोलत होत्या.



सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या यशाचं वाटेकरी झाल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सर्वांचं आभार व्यक्त केले.



यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी जिथे कायदे बनविले जातात, त्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या सर्वोच्च सभागृहात केवळ तुमच्या आशीर्वादामुळे पोहोचले आहे. तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. हा विजय माझ्या एकटीचा नाही काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या सहकार्यामुळे हा विजय झाला आहे. 



यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, शहरातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले, कार्यतत्पर लोक प्रतिनिधी कार्य केल्यानं लोकसभा निवडणुकीत शहरी नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून खासदार म्हणून निवडून दिले. आता तुमच्या सर्वांची कामे करणे, हेच माझे कर्तव्य आहे. तुमची जी स्वप्न आहेत, ती पूर्णत्वास नेण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करेन, असंही खा. शिंदे यांनी यावेळी म्हटले.



या कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, दिलीपराव माने, विश्वनाथ चाकोते, धर्मराज काडादी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री भाकप चे माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, जनार्दन कारमपुरी, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, अलका राठोड, सुशिला आबुटे, मनोहर सपाटे, आरिफ शेख, शिवसेनेचे अस्मिता गायकवाड, अजय दासरी, विष्णू कारमपुरी, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, आम आदमी पार्टीचे निहाल किरनल्ली, समाजवादी पार्टीचे अबुतालीब डोंगरे, महेश गादेकर, सुरेश फलमारी, दत्ता सूरवसे, नाना काळे, भारत जाधव, महादेव कोगणुरे, सुनीता रोटे, सुदीप चाकोते, रियाज हुंडेकरी, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, शिवा बाटलीवाला, उमेश सुरते, नागनाथ कदम, युवराज जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

....... चौकट ......

सहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागू या : खा. शिंदे 

येणाऱ्या तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे. विरोधक पुन्हा जाती-धर्मात भांडणे लावण्याचा उद्योग करणार आहे. त्या गोष्टीला बळी पडू नका, शेवटी नुकसान आपले होणार आहे. म्हणून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन जागृती करा. सोलापूर लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागू या, असे आवाहनही खासदार शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.