आंतर जिल्हा सराईत गुन्हेगाराकडून घरफोडी-चोरीचे ०६ गुन्हे उघडकीस
सोलापूर : पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदिप पाटील यांच्या पथकास खबऱ्याकडून, पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभुते हा मार्केट यार्ड परिसरात पहाटे ०५.०० वा. चे सुमारास संशयितरित्या फिरत असल्याची खात्रीशीर गोपनिय माहिती मिळाली. त्या खबरीनुसार स. पो. नि. संदिप पाटील व त्यांच्या पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडीत विभुते (वय-४२ वर्षे) यास मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतले. त्यानं घरफोडी-चोरीच्या ०६ गुन्ह्यांची कबुली दिलीय. त्याच्या ताब्यातून जवळपास ३९ तोळे सोने, १८ किलो चांदी आणि चारचाकी वाहनासह २८,४१,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
२० जून रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या कचाट्यात सापडलेला सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभुते हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गांवचा रहिवासी आहे. त्याच्याकडे स.पो.नि. पाटील व त्यांच्या तपास पथकाने केलेल्या चौकशी तपासात, त्याने जोडभावी पेठ पोलीस ठाणे, भादंवि ४५४, ४५७, ३८० हा गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यानंतर, त्यास त्या गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गेला माल हस्तगत करण्याकामी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली.
पोलीस कोठडीत राजकुमार विभूते यानं, गतवर्षी सोलापूर शहरात जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी ०३ घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे, त्याने व त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांनी मिळून एप्रिल-२०२४ मध्ये बारामतीमध्ये ०२ घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल करून त्यातील चोरीचे दागिने काढून दिले.
अशा प्रकारे, शहर गुन्हे शाखेने, ०६ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून ३८९.३ ग्रॅम (३८.९ तोळे) सोन्याचे दागिने (किंमत - १६,०४,९०० रूपये) व १७ किलो ८३५ ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत - ६,७३,५०० रूपये) तसेच गुन्हा करणेसाठी वापरलेली निसान कंपनीची कार व चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्याची (आटणी) मशिन व त्याकामी लागणारे साहित्य रक्कम, ५,६३,००० रूपये असा एकूण २८,४१,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला..
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. संदिप पाटील व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, चालक सतिश काटे, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.