सोलापूर : दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा उपयोग त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडथळा होऊ नये, मुक्त संचार करता यावा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आव्हाने कमी होण्यास यामुळे निश्चितपणे मदत होणार आहे, असे मत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका उर्दू मुलांची कॅम्प शाळा, सोलापूर येथे गुरुवारी, २५ जुलै रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण १६० विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप करण्यात आली. याप्रसंगी आयुक्त शीतल तेली-उगले बोलत होत्या.
समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने पुरविण्याच्या अनुषंगाने मोजमाप शिबिराचे आयोजन MPRTC, मनपा मराठी मुलांची केंद्र शाळा क्रमांक ६, जोड बसवण्णा चौक, सोलापूर येथे दिनांक २६ व २७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले होते.
या शिबिरातून संदर्भित झालेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण,महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आणि ADIP योजनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने, वाटप करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना थेरपीची आवश्यकता आहे, त्यांनी महानगरपालिका सोलापूर अंतर्गत असणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आयुक्त तेली-उगले यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी-पालकांना केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केले. स्वागतगीत अक्षय जंगलगी या विद्यार्थ्यांनी सादर केले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदिती हिबारे व पालक प्रतिनिधी म्हणून ऐश्वर्या हुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
साहित्य साधने वाटप कार्यक्रमामध्ये एकूण १६० दिव्यांग विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य साधनांमध्ये तीन चाकी सायकल ०९, कुबड्या २०, सुगम्य केन १९, ब्रेलकिट ११, कानापाठीमागील श्रवण यंत्र ८८, सीपी चेअर विथ कमोड २६, व्हीलचेअर ४६, रोलेटर ३०, स्मार्टफोन २४ अशा प्रकारे २८६ साहित्य साधने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.
याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर, पर्यवेक्षक भगवान मुंडे, लष्कर आवारातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. स्नेहा पुजारी यांनी केले. प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित शिक्षणांतर्गत सर्व विशेष शिक्षक व विषयतज्ञ यांनी परिश्रम घेतले.