Type Here to Get Search Results !

रिक्षा फिटनेसचा दंड रद्द करा, अन्यथा १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना घेराव अटळ : कॉ. आडम मास्तर


सोलापूर : २९ जून रोजीच्या मेळाव्यात घेतलेल्या निर्णयानुसार तसेच रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती, सोलापूरच्या आवाहनानुसार बुधवारी, ३ जुलै रोजी 'रिक्षाच्या फिटनेसचा दंड रद्द करा' या प्रमुख मागणीबरोबर रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा नेण्यात आला. पंढरपूरच्या विठोबाने शासनास सुबुद्धि दिली तर हा अन्यायकारक जुलमी दंड रद्द करतील, ...अन्यथा संघर्ष अटळ असल्याचेही कॉ. आडम मास्तर यांनी यावेळी म्हटले. 

चार हुतात्मा पुतळा चौक इथं थोर हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. या मोर्चाच्या अग्रभागी कॉ. आडम मास्तर, रियाज सय्यद, प्रकाश आळंदकर, अजीज खान, कॉ. सलीम मुल्ला, प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत होऊन विविध संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी आपले मत मांडले. 

या प्रसंगी बोलताना प्रदेश वाहतूक महासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी २१ मे २०२४ रोजी संगणकीय प्रणालीवर दंडाची आकारणी सुरु झाल्यानंतर रिक्षा फिटनेसकरिता असलेली ६०० रुपयांची ही विलंब शुल्कासह हजारो रुपयात जाऊ लागलीय. ही आकारणी जाचक असल्याने सर्व संघटनांनी शासनास निवेदन देऊन कारवाई अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची मागणी मांडली. 



राज्याच्या परिवहन आयुक्तांनी याविषयी बैठक घेऊन शासनास कळविण्याचे आश्वासन देऊन आपले हात झटकले, म्हणून सर्वसमावेशक विचार करून सर्व संमतीने २९ जून २०२४ रोजीच्या मेळाव्यात निर्णय घेतल्याप्रमाणे आज मोर्चा काढत आहोत. जर मागणी मान्य नाही झाली तर १६ जुलै चा कार्यक्रम केल्याशिवाय रिक्षा चालक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश आळंदकर यांनी शासनाचे वाहतुकीबाबतचे धोरण हे मोठ्या वाहनाच्या व्यवसायावर करत असल्याने तुलनेने व व्यवसायाने छोटे असलेले रिक्षाचालक यामध्ये भरडले जात आहेत. मागील आंदोलनाची आठवण करून देत रिक्षा चालक एकदा जिद्दीला पेटला तर तो आपली मागणी केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. हा इतिहास असून परत एकदा नवीन इतिहास घडविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉ. आडम मास्तर यांनी रिक्षा चालकांची परिस्थिती कथन करत अनेक मोठ्या-मोठ्या उद्योगपतींना करोडो-अरबो रुपयांची कर्ज माफी शासन देत असताना, दिवसाचे १२-१२ तास इमाने - इतबारे राबून अहोरात्र प्रवाशी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना फिटनेससाठी दररोज ५० रुपयांप्रमाणे दंड आकारून आर्थिक पिळवणूक करत आहेत. 



जोडीला ट्राफिक पोलीस असून रस्त्यावरून वाहन चालविताना त्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. कधी फोटो निघेल आणि कधी मेसेज येईल, याचा पत्ता नाही. रिक्षा चालक कसा तरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवा, म्हणून कष्ट करत असताना या जिजीया दंडामुळे मेटाकुटीला आलेला आहे. 

मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना रिक्षा चालक घेराव घालून फिटनेसकरिता असलेल्या विलंब शुल्कातून रिक्षा चालकांना वगळण्याची मागणी करणार आहेत. आज कृती समितीकडे ५०० पेक्षा जास्त रिक्षा चालकांनी रिक्षासहित घेराव आंदोलनात सहभागी होण्याकरिता नोंदणी केलीय. रिक्षा चालकांच्या सहभागी संख्येत वाढ होईल. पंढरपूरच्या विठोबाने शासनास सुबुद्धि दिली तर हा अन्यायकारक जुलमी दंड रद्द करतील, ...अन्यथा संघर्ष अटळ असल्याचेही कॉ. आडम मास्तर यांनी यावेळी म्हटले. 

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी, जमीर शेख व सिटूचे राज्य सचिव युसुफ शेख (मेजर) यांनी उपस्थित राहून आपला पाठींबा व्यक्त करत रिक्षा चालकांच्या या आंदोलन प्रसंगी त्यांच्यासमवेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजीज खान यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक चांदसाब मुजावर यांनी केले. प्रदीप शिंगे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनील भोसले, चंद्रकांत गायकवाड, संतोष गायकवाड, अनिल मोरे, राजू सिद्धगणे, रफिक बागवान (विद्यार्थी वाहतूक), जब्बार शेख, बळी गायकवाड, वसंत माने, रफिक पिरजादे, अलीशेर मैंदर्गी, मौलाली दर्जी, शब्बीर फुलमामडी, अकिल शेख, रफिक काझी, सतीश गुंड, असिफ पठाण, नरेश दुगाणे,  शाम आडम आदींनी विशेष परिश्रम घेतले.