सोलापूर : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय विरोधकांनी थिटे कुटुंबाला हाताशी धरून पाटील परिवाराची राजकीय पटलावर प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरु केल्याची फिर्याद अजिंक्यराणा पाटील यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केलीय. त्यानुसार मोहोळ पोलिसांनी उज्वला महादेव थिटे, जयवंत महादेव थिटे (दोघे राहणार अनगर) आणि यासंदर्भात बातम्या छापणारे व दाखविणारे वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे मोहोळ तालुक्याच्या राजकीय पटलावर खळबळ माजलीय.
मोहोळ तालुक्यातील राजकारण ही त्याच अपवाद नाही. मोहोळ तालुक्यातील अनगर येथील उज्वला महादेव थिटे त्यांचा मुलगा जयवंत यांनी, ०२ जुलै रोजी सोलापुरातील पत्रकार भवनात माजी आमदार पुत्र अजिंक्यराणा पाटील विरोधात दाखल गुन्ह्यासंदर्भात तोफ डागली. या पत्रकार परिषदेत थिटे कुटुंबानं, त्यांनी स्वतः दाखल केलेल्या गुन्ह्यात पाटील परिवारातील विक्रांत पाटील आणि वडील या नात्याने राजन पाटील यांचा कोणताही संबंध नव्हता, तरी सुध्दा विरोधकांनी पाटील परिवाराची राजकीय प्रतिमा कलंकित करण्यासाठी थिटे परिवाराला मैदानात उतरवून पाटील परिवाराची प्रतिमा मलिन करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला, असल्याची फिर्याद अजिंक्यराणा राजन पाटील यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केलीय.
उज्वला थिटे यांनी सोलापुरातील पत्रकार भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्यराणा पाटील आणि पाटील परिवारावर बेछूट आरोप करताना ' असे-तसे ' करण्याची धमकी दिलीय. त्या पत्रकार परिषदेत वार्तांकन करणाऱ्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी वा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व दाखविणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी निराधार वृत्त प्रसारित करून विक्रांत पाटील व राजन पाटील यांची राजकीय-सामाजिक प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्या फिर्यादीत म्हटले आहे.
आगामी विधानसभा डोळ्यापुढे ठेवून पाटील कुटुंबातील सदस्यांचा त्या गुन्ह्याशी संबंध नसताना विरोधक यांच्या तक्रारीशी संबंध आहे, असे सांगून बदनामी करण्याच्या हेतूने आरोप केल्याचेही अजिंक्यराणा पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत उल्लेख केला आहे.
त्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी उज्वला थिटे व जयवंत थिटे यांच्या आरोपांची खातरजमा न करता, अजिंक्यराणा व त्यांच्या कुटुंबाची बदनामी होईल, या उद्देशाने बातम्या प्रकाशित केलेल्या व वाहिन्यावर दाखविलेल्या वृत्तपत्रांच्या वाहिन्यांच्या विरोधात एन.सी.आर. भा.न्या.संहिता 2023 कलम 356(2), 356(3), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक करणेवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
...चौकट ...
जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील ' वजनदार ' घराणं
अवघ्या मोहोळ तालुक्यातच नाही तर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील ' वजनदार ' घराणं म्हणून अनगरच्या पाटील परिवाराकडे पाहिलं जातं. याच परिवारातून तिसरी पिढी आता राजकीय पटलावर कार्यरत आहे. राजकारण म्हटलं की, हेवेदावे कुरघोड्या आल्याचं, प्रत्येकाला आपलं राजकीय स्थान मजबूत करायचं तर विरोधकांना हतबल करावंच लागतं, हे केवळ सिनेसृष्टीच्या पडद्यावरच नव्हे तर प्रत्येक पिढी वास्तवातही पदोपदी अनुभवत असते.