मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून प्रशासन व मंदिर समितीने आषाढी वारीला स्वच्छतेचे स्वरूप मिळवून दिले.
तिरुपतीच्या धरतीवर दर्शन मंडप व टोकन दर्शन सिस्टीम राबवण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या 100 कोटीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूरी.
या आषाढी वारीत प्रशासनाकडून दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले.
आषाढी वारीसाठी पंढरपूर शहरात येणाऱ्या पालखी सोहळा प्रमुख व वारकरी यांच्याकडून स्वच्छता व अन्य सोयी सुविधा बद्दल समाधान व्यक्त, शासन व प्रशासनाचे मानले आभार.
"आषाढी शुद्ध एकादशी, 17 जुलै रोजी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. 'बा विठ्ठला शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी ठेवून त्यांना समृद्धी येऊ दे..' असे साकडे मुख्यमंत्री यांनी विठ्ठल चरणी घातले. यावर्षीच्या वारीला किमान 15 ते 18 लाख भाविक आलेले होते.
किंबहुना प्रशासनाने मागील दोन महिन्यापासून एवढ्या मोठ्या संख्येने भाविक वारीला येतील हे गृहीत धरून पालखी मार्ग व पंढरपूर शहरात वारकरी व भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवणे, गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ड्रोन कॅमेरा व सीसीटीव्ही च्या माध्यमातून दक्ष राहणे तसेच चंद्रभागा नदीमध्ये कोणतीही आपत्ती जनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणे व या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वारकरी व भाविकाला विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच येथील स्वच्छता व सुविधा देऊन समाधानी करणे यासाठी नियोजनबद्ध काम सुरू होते. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रत्येक बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून सर्व कामे सुरळीतपणे होत आहेत याची खात्री स्वतः करत होते, व यासाठी 11 जुलैपासून ते पंढरपूर येथेच मुक्कामी होते."
भाविकांची संख्या व सोयी सुविधा
आषाढी वारी 2024 मध्ये मागील वर्षीच्या दीडपट भाविक येतील हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने पालखी मार्ग विसावा व मुक्कामाची ठिकाणे व पंढरपूर शहर, वाखरी पालखी तळ तसेच 65 एकर येथे वारकरी, भाविक यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या.
यामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, 15 लाख पाणी बॉटल व मँगो ज्यूस, पाण्याचे टँकर, पालखीतळाचे मुरमीकरण, मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप, चंद्रभागा वाळवंटात तात्पुरती स्नानगृहे उपलब्ध करणे, स्तनदा मतांसाठी हिरकणी कक्ष, ठिकठिकाणी आरोग्य पथके दूचाक्कीवर आरोग्य दूत, पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढणे, मोबाईल टॉयलेट, सुलभ शौचालये, व्हीआयपी दर्शन बंद, दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची काळजी या सुविधांचा समावेश होतो. वारीत किमान 15 ते 18 लाख भाविक गृहीत धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व सुविधा व्यवस्थितपणे वारकऱ्यांना मिळतील यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिलेले होते.
प्रशासनाच्या या सर्व सोयी सुविधामुळे अनेक पालखी सोहळा प्रमुख, वारकरी व भाविक यांनी खूप समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांच्या टीमचे कौतुक केले. या वर्षाच्या आषाढी वारी पंढरपूर शहर प्रथमच खूप स्वच्छ दिसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. रस्ते सफाई, कचऱ्याची विल्हेवाट, शौचालयाची व्यवस्था व पाण्याची उपलब्धता अशा सुविधामुळे भाविकांना याचा खूप लाभ झाला. प्रशासनाच्या सुविधामुळे भाविकांना एवढ्या मोठ्या गर्दीतही प्रशासन अत्यंत उत्तम प्रकारे काम करत असल्याचे दिसले.
पंढरपूर शहर व पालखी मार्गावर शौचालयाची स्वच्छता
शहरात सुलभ शौचालय, नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले कायमस्वरूपी शौचालय व मुख्य गर्दीच्या ठिकाणी, मंदिराकडे प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर तात्पुरती शौचालय ठेवण्यात आली. या सर्व शौचालयाच्या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याप्रमाणेच हे शौचालय भरल्यानंतर त्यातून मैला उचलून घेऊन जाण्यासाठी नगरपालिकेने सक्शन मशीन वाहनाची व्यवस्था ठेवलेली होती. तसेच प्रत्येक शौचालयाच्या ठिकाणी साफसफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने वेळोवेळी शौचालये स्वच्छ केली जात असल्याने खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता झालेली दिसून येत आहे.
येथे आलेल्या भाविकांना सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे शौचालय 21 ठिकाणी 2062, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधणेत आलेले कायमस्वरुपी शौचालये 2 ठिकाणी 1864, एमटीडीसीमार्फत बांधण्यात आलेले 2 ठिकाणी 226, तिर्थक्षेत्र विकास आराखडयामार्फत उभारणेत आलेले कायम स्वरूपी शौचालये ठिकाणे 9 ठिकाणी 136, नगरपरिषदेमार्फत उभारणेत आलेले कायम स्वरूपी सार्व. शौचालये 21 ठिकाणी 109 व प्री फॅब्रीकेटेड शौचालये 54 ठिकाणी 1800 सिट्स अशा प्रकारचे स्वच्छ मुबलक पाण्यासह शौचालये उपलब्ध झाल्याने भाविकांनी या शौचालयाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सर्व शौचालय स्वच्छ ठेवले जात आहेत का नाहीत याची खात्री स्वतः वेळोवेळी भेट देऊन केली. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून त्या सर्व साफसफाई कर्मचाऱ्यांना शौचालये वेळेत स्वच्छ झाले पाहिजेत यासाठी त्यांच्यावर सुपरवायझिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठका घेऊन सफाई कर्मचाऱ्यांनी शौचालय वेळेत स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले होते. सुपरवायझर यांच्याशी झालेल्या बैठकामुळे साफसफाईच्या कामाला अधिक गती आलेली होती.
वारीचा मुक्काम संपला की तात्काळ स्वच्छता मोहीम
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी यांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पंढरीच्या दिशेने जाताना ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे, त्या ठिकाणचा मुक्काम संपल्यानंतर संबंधित नगरपंचायत व ग्रामपंचायत यांच्या वतीने तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घेऊन मुक्कामाचे ठिकाणावरील साफसफाई केली जात असे. यावर्षी वारीमध्ये प्रथमच या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवल्याने स्थानिक नागरिक प्रशासनाच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त करत होते.
मुख्यमंत्री यांच्याकडून स्वच्छतेबाबत प्रशासनाचे कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी पूर्वी पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील विविध सोयी सुविधाबाबत प्रत्यक्ष पाहणी केली तसेच भाविकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी शौचालयातील स्वच्छता स्वतः जाऊन पाहिली. पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील रस्ते व शौचालयाची स्वच्छता बद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेऊन भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शहराचे पाच भाग-
आषाढी वारीत आषाढी एकादशीला किमान 15 लाख वारकरी या भाविक पंढरपूर शहरात येऊ शकतात, याचा अंदाज घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सिडेंट कमांडर, जिल्हा नगरपालिका प्रशासन व पंढरपूर नगरपरिषद यांनी पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहराचे पाच भाग करून या पाच भागांमध्ये स्वच्छतेची धुरा सांभाळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी ब्रांच डायरेक्टर ऑफ हायजिन म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांची नियुक्ती केली. त्यांच्या अंतर्गत पाच वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 13 मुख्याधिकारी हे स्वच्छता नोडल अधिकारी म्हणून नेमले होते .या परिसरात चंद्रभागा वाळवंट, पत्रा शेड परिसर ,65 एकर परिसर, प्रदक्षिणामार्ग व मंदीर परिसर, बसस्थानक , अर्बन बँक असे 5 भाग करण्यात आले होते.
स्वच्छतेच्या दृष्टीने चंद्रभागा वाळवंट हा सर्वात आव्हानात्मक भाग असल्यामुळे तेथे एकूण सात भागात सात मुख्याधिकारी नेमले होते. प्रत्येक मुख्याधिकारी यांच्याकडे शहर समन्वयक, शहर अभियंता, स्वच्छता निरीक्षक, नप लिपिक तसेच सफाई कर्मचारी अशी प्रत्येकी वीस जणांची टीम नेमलेली होती. या कामाकरीता 50 स्वयंसेवकांनी सुद्धा मदतीचा हातभार लावला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीपूर्वी सोयी सुविधाचे पहाणी करताना चंद्रभागा वाळवंटात स्वच्छतेच्या दृष्टीने आणखी मनुष्यबळ वाढवण्याबाबत सुचित करण्यात आले होते, तसेच चंद्रभागा नदीकडेच्या दोन्ही बाजूचे स्वच्छता वेळोवेळी करून संपूर्ण वाळवंट स्वच्छ राहील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रशासनाने अत्यंत चोखपणे नियोजन करून वाळवंट परिसर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
चंद्रभागा वाळवंट परिसरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात, या परिसरात वारकऱ्यांना, भाविकांना, महिलांना स्वच्छतेची सुविधा देण्याकरता एकूण 400 तात्पुरते शौचालय उभारले गेले होते ,पूर्ण शहरात एकूण 2000 तात्पुरते शौचालय उभारले गेले होते, या शौचालयाची वारंवार स्वच्छता, निर्जंतुकीकरण त्यातील मैलाचे सक्शन तसेच शौचालयासाठी पाण्याचा पुरवठा व हँडवॉशची सुविधा व वारंवार स्वच्छता करून घेण्यासाठी या सर्व मुख्याधिकारी व त्यांच्या जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली तर पंढरपूर मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी सर्व पथकास आवश्यक साधनसामग्री अत्यंत तत्परतेने उपलब्ध करून दिली.
आषाढी एकादशी पासून पंढरपूर शहर स्वच्छता
आषाढी एकादशीच्या रात्रीपासुनच 24 तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असुन याकामी शहरासह 65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1348 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये 348 कायम तर 1000 हंगामी कर्मचारी तसेच इतर नगर पालिकेकडून ही स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तसेच 41 घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 8 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 1 डंपरप्लेसर, 4 ट्रॅक्टर ट्रॉल्या व जेसीबीच्या सहाय्याने दररोज 70 ते 80 टन कचरा उचलण्यात येत आहे. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी प्रशासनास आतापर्यंत चांगले सहकार्य केले आहे.
व्हीआयपी दर्शन बंद व दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही, यासाठी उपाय योजना
जिल्हा प्रशासनाने दर्शन रांगेत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी यावर्षी चांगली उपायोजना केलेली होती. दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात येईल, याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेप्रमाणे काढले होते. दर्शन रांगेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासनतास थांबलेल्या भाविकासमोर अन्य भाविकांनी घुसखोरी करू नये, म्हणून ठिकठिकाणी होऊ डबल बॅरिकेडींग केलेले होते. अशा ठिकाणी पोलिसासोबतच मंदिर प्रशासनाचे कर्मचारी नियुक्त केलेले होते, जे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्यामुळे यावर्षीच्या आषाढी यात्रेत कोठेही दर्शन रांगेत घुसखोरी झालेली नाही. दर्शनासाठी लागणारा कालावधी ही यामुळे कमी झाला असल्याने वारकरी, भाविक यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
त्याप्रमाणे यावर्षी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप वेळ भाविकांना थांबावे लागत असल्याने मंदिर ते पत्रा शेड गोपाळपूर या दर्शन रांगेत चार ठिकाणी विसावा केंद्र निर्माण केलेले होते. ज्यामुळे भाविकांना थकवा आल्यास ते या विसावा केंद्रात आराम करत होते. दर्शन रांगेतील या सुविधामुळे तासंतास दर्शनासाठी थांबावे लागत असले तरी विसावा केंद्रामुळे त्यांचा थकवा निघून जात होता. दर्शन रांगेतील विसावा केंद्र ही संकल्पना भाविकांसाठी खूपच लाभदायी ठरलेले दिसून येत आहे. त्याप्रमाणेच व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे भाविकांकडून प्रशासनाचे फार मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला व वारकरी, भाविक हेच खरे व्हीआयपी असल्याचे सांगितले.
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी
या उपक्रमांतर्गत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भाविक यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यात्रा कालावधीत सुमारे 15 लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पंढरपूर येथे चार ठिकाणी महा आरोग्य शिबिरे सुरू करण्यात आली होती तर तीन ठिकाणी अतिदक्षता विभाग उभारण्यात आलेले होते.
108 रुग्णवाहिकेव्दारे 1437 गंभीर रुग्णांना अत्यावश्यक सेवेचा लाभ
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना प्रशासनाकडून सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या होत्या. यावेळी वारकऱ्यांना आरोग्याच्या तात्काळ व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने 30 रुग्णवाहिका (108) या वारीत सहभागी झाल्या होत्या. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वारीत 1, 437 गंभीर रुग्णांना अत्यावशक सेवेचा लाभ झाला. या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यास 108 रुग्णवाहिका यशस्वी ठरली. भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी 17 रुग्णवाहिका वेगवेगळ्या ठिकाणी थांबवलेल्या होत्या तसेच 11 रुग्णवाहिका आरोग्य शिबीर ठेवण्यात आल्या होत्या तर 2 रुग्णवाहिका या रिलेसाठी राखीव ठेवलेल्या होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर येथे ठाण मांडले
यावर्षीची आषाढी वारी ही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासाठी पहिलीच वारी होती. यावर्षी पाऊस वेळेवर झालेला असल्याने शेतकऱ्यांच्या पेरणी झालेली होती. त्यामुळे मागील वर्षीच्या दीडपट भावी येतील ही प्रशासनाची अपेक्षा होती, त्याप्रमाणे किमान 15 ते 18 लाख भाविक गृहीत धरून प्रशासन त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करत होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीत भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दिनांक 11 जुलै 2024 पासून पंढरपूर येथेच मुक्काम केला व सर्व प्रशासकीय यंत्रणा अत्यंत गतिमान पद्धतीने राबवून पालखी वारकरी व भाविकांना सर्व सुविधा उत्कृष्ट व वेळेत मिळतील यासाठी स्वतः लक्ष घातले. जिल्हाधिकारी स्वतःच पंढरपूर येथे ठाण मांडून बसले असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा व त्यांचे प्रमुख अत्यंत गतीने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत होते. सोयी सुविधा देण्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी तात्काळ सोडवल्या जात होत्या.