सोलापूर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करून चांगल्या मोबदल्यात दाम दुप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदाराची जवळपास २१ लाख रुपयांची करण्यात आलीय. ही घटना ०३ ऑगस्ट २०२२ ते १२ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडलीय. याप्रकरणी गणेश आनंद काळे ऊर्फ टकले, (रा.निलम नगर, सोलापूर) या ठकसेनाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरातील दाजी पेठ परिसरात राहणारे दिलीप राजेंद्र रंगरेज (वय-४९ वर्ष) यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून दुप्पट परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने विश्वास संपादन करून गणेश काळे उर्फ टकले याने २०,९६,५०० रूपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. दिलीप रंगरेज यांची अधिक परतावा मिळण्याची आशा दाखवून जवळपास २१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकारची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दिलीप रंगरेज यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पूर्व परिचित गणेश काळे उर्फ टकले याच्याविरुद्ध रविवारी, रात्री फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी काळे याच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिवे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.