Type Here to Get Search Results !

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने 36 लाखांची फसवणूक; चौकडीचा प्रताप


सोलापूर : परदेशात नोकरीची उत्तम संधी देण्याच्या बहाण्याने जवळपास 60 जणांची फसवणूक झालीय. डायनॅमिक कन्सल्टन्सी अँड मॅन पॉवर सर्विसेस नावाने सोलापुरात सुरू केलेल्या शॉप मध्ये जवळपास या सर्व इच्छुकांची 36 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान उत्तर सदर बझार विद्यानगरात घडलाय. हा शॉप सुरू केलेल्या चौकडीने सिराज अब्दुल रशीद नदाफ यांच्यासह त्या सर्व इच्छुकांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सय्यद मसूद उर्फ असद गझनफर अली खतीब (रा. कोंडा नगर, सोलापूर) याच्यासह चौघा जणांनी अशोक चौकातील आर. एन. गोली सेलिब्रेशन मध्ये शॉप क्रमांक 30 मध्ये पहिल्या मजल्यावर डायनेमिक कन्सल्टन्सी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस नावाचे कार्यालय थाटले होते. या कार्यालयात सिराज अब्दुल रशीद नदाफ याला नोकरीस ठेऊन ' परदेशात नोकरीची उत्तम संधी ' चे पॅम्पलेट छापताना जाणीवपूर्वक सिराज नदाफ याचा भ्रमणध्वनी क्रमांक छापला होता.

परदेशात नोकरी करण्याची इच्छा आणि संधीच्या आमिषाला बळी पडून जवळपास 60 इच्छुक उमेदवारांकडून 36 लाख रुपये घेण्यास भाग पाडून ती रक्कम फोन पे गुगल पे बँकेद्वारे व रोख स्वरूपात घेऊन 18 लोकांचा बनावट विजा, लेटर ऑफर लेटर हे बनावट कागदपत्रे तयार करून ते लोकांना सिराज नदाफ याच्या करवी देऊन त्या सर्व लोकांची व नदाफ यांची फसवणूक केली. या रक्कमेची मागणी केली असता, रईस अहमद इलाहीबक्ष दलाल (रा. सोलापूर) याने त्यांना शिवीगाळी करून हाकलून दिले.

याप्रकरणी सिराज अब्दुल रशीद नदाफ यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सय्यद मसूद उर्फ असद गझनफर अली खतीब (रा. कोंडा नगर, सोलापूर), सय्यद नवेद हुसेन (रा. मगदूमिया बिल्डिंग, माहीम दर्गासमोर माहीम, मुंबई), सय्यद गझनफर अली खतीब (रा. कोंडा नगर, सोलापूर) आणि रईस अहमद इलाहीबक्ष दलाल (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध 36 लाख रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिवळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.