सोलापूर : सन 2023 मधील खरीप दुष्काळाच्या अनुषंगाने 5 लाख 19 हजार 849 बाधित शेतकरी यांना 689 कोटी अनुदान महसूल व वन विभागाकडील, 29 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूर झालेले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.
त्यामध्ये बार्शी, माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश आहे. अनुदान बार्शी तालुक्यातील 31395 बाधित शेतकरी, माढा तालुक्यातील 76724 बाधित शेतकरी, करमाळा तालुक्यातील 72113 बाधित शेतकरी, सांगोला तालुक्यातील 75616 बाधित शेतकरी आणि माळशिरस तालुक्यातील 77951 बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्यासाठी सबंधित तहसिलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूरी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील 21252, माढा तालुक्यातील 64871, करमाळा तालुक्यातील 62859, सांगोला तालुक्यातील 64650 आणि माळशिरस तालुक्यातील 63792 असे एकुण 277424 बाधित शेतकऱ्यांना रक्कम 489 कोटी मदतीचा समावेश आहे.
सद्यस्थितीत बार्शी तालुक्यातील 3550, माढा तालुक्यातील 3240, करमाळा तालुक्यातील 1970, सांगोला तालुक्यातील 3678 आणि माळशिरस तालुक्यातील 5428 बाधित शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण न झालेने रक्कम 21,65,56,495/-रुपये प्रलंबित आहे. तसेच सोलापूर जिल्हयातील अंदाजित 1 लाख खातेदारांना त्यांची बँक व आधारकार्ड संलग्न नसलेमुळे, सामाईक खातेदारांची कोणच्या खातेवर रक्कम जमा करावी याबाबतची संमतीपत्र दिले नसल्याने, मयत खातेदारांची वारस नोंद झाली नसल्याने तसेच परगावीच्या खातेदारांचे बॅक तपशील, आधारकार्ड तपशील इ. उपलब्ध न झाल्याने अनुदान वाटप करणे प्रलंबित आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी उपरोक्त नमूद कारणामुळे अनुदान न मिळालेल्या खातेदारांना कागदपत्रांची पुर्तता करणे बाबत संबंधित तलाठी कार्यालय अथवा तहसिल कार्यालय यांचेकडे, 10 जुलै, 2024 पूर्वी संपर्क करणेचे आवाहन केले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे.