सोलापूर : गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामधून प्रकाशित होणारे आणि महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर लोकमान्य झालेल्या दाते पंचांगाचे कार्य गेली अनेक वर्षे मोहन दाते करीत आले आहेत. पंचांग क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून रविवारी, ०९ जून रोजी रविवारी येवला येथे संपन्न झालेल्या मराठी संस्कृत साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांचा लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे कुलपति मनोहरशास्त्री सुकेणकर यांचे हस्ते आणि डॉ. राजेश सरकार संस्कृत विभाग प्रमुख बनारस हिंदु विद्यापीठ (BHU) वाराणसी यांचे प्रमुख उपस्थितीत डी. लिट् (विद्यानिधी) हि सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा आणि सौ. वीणा दाते यांचा सन्मान करण्यात आला.
पंचांग हा आकाशाचा आरसा असला पाहिजे, म्हणजे पंचांगात दिलेली ग्रहस्थिती आकाशात दिसली पाहिजे असे विधान लोकमान्य टिळक यांनी १९०६ मध्ये मुंबई येथे एका ज्योतिष अधिवेशनात केले होते. त्याप्रमाणे अचूक गणित असलेल्या दाते पंचांग परंपरेचा लोकमान्य संस्कृत विद्यापीठा ने डी. लिट. ही मानाची पदवी देऊन जो सन्मान केला, तो अत्यंत आदरपूर्वक स्वीकारीत आहे, असे मनोगत मोहनराव दाते यांनी व्यक्त केले. या समारंभाचे आयोजन व सूत्र संचालन पंडित प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांनी केले.