अमेरिकेतील गांधी-किंग परिषदेसाठी अदनान कोथिंबिरेंची निवड प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने गुरुवारी सत्कार व व्याख्यानाचे आयोजन

shivrajya patra


सोलापूर : अमेरिकेतील अल्बामा विद्यापीठात होणाऱ्या गांधी- मार्टिन ल्युथर किंग परिषदेसाठी सोलापुरातील गाजियोद्दीन अकादमीचे सदस्य अदनान कोथिंबिरे यांची निवड करण्यात आली आहे.  प्रगतिशील लेखक संघ, सोलापूरच्या वतीने गुरुवारी सायंकाळी, हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटर मध्ये अदनान महिबुब कोथिंबीरे यांच्या सत्काराचं व ज्येष्ठ कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या व्याख्यानाचा आयोजन करण्यात आलंय. 

अमेरिकेतील अल्बामा विद्यापीठात दरवर्षी महात्मा गांधी आणि मार्टीन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांच्या विचारधारेवर गांधी-किंग परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेसाठी जगभरातील विद्यार्थ्यांना अमेरिका सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून आमंत्रित केले जाते. भारतातून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमधून ही निवड केली जाते. संपूर्ण देशातून यावर्षी फक्त १० जणांची या परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये  अदनान कोथिंबीरे यांचा समावेश आहे.

गाजियोद्दीन अकादमी ही संस्था सोलापूर शहरात मागील दशकभरापासून दखनी संस्कृती, मध्ययुगीन इतिहास, उर्दू फारसी साहित्य याविषयी संशोधन करत आहे. या संस्थेअंतर्गत कोथिंबिरे हे अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. उर्दू भाषेतील साहित्य इंग्रजी भाषेत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

कोथिंबिरे यांनी दयानंद महाविद्यालयातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सोलापूर शहरातील वेगवेगळ्या चळवळी आणि आंदोलनात ते सहभागी असतात. या निवडीबद्दल सोलापूर शहरातील वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे.

या सत्कार सोहळ्याला ज्येष्ठ समीक्षक प्रा. रणधीर शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारा असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रगतशील लेखक मंचाचे अध्यक्ष प्राचार्य महेंद्र कदम भूषवित आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असं आवाहन प्रगतिशील लेखक मंचच्या वतीने करण्यात आलंय.


To Top