अर्थसंकल्पामध्ये महिला-भगिनींसाठी विविध योजना आणि सवलती जाहीर
सोलापूर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये महिला-भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत यासह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार, त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटले.
राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महिलांकरिता आर्थिक योजना आणि सवलती देणारी योजना जाहीर केली. या प्रित्यर्थ रविवारी नवी पेठेतील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात महायुती शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांचा सामान्य महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना आमदार देशमुख बोलत होते.
यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेविका कल्पना कारभारी, माजी नगरसेविका ज्योती बमगोंडे, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, विमल पुट्टा, सभागृह नेते संजय कोळी, राजकुमार पाटील, किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.