शिवाजीराजे शूर, वीर, पराक्रमी, महाबलवान, सर्वशक्तिमान, मोठ्या राज्याचे धनी होते, परंतु ते कायदेशीररीत्या सार्वभौम अभिषिक्त राजा नव्हते. त्यामुळे परंपरेने वारसदार होऊन बादशहा म्हणून मिरवणारे मोगलशाही, कुतूबशाही, आदिलशहीचे प्रमुख वा काही सरदारही शिवाजीराजेंना बरोबरीचे मानत नव्हते. एवढेच नाही तर अनेक ज्येष्ठ मराठा सरदार वा जहागीरदारही मोठेपण मानण्यास तयार नव्हते. त्या काळी आपापसातील करारनामे, जमीन इनामे, चलन, कायदे पालन यासाठी राज्य प्रमुख राजा असणे सामाजिक, राजकीय व धार्मिक गरज होती. दक्षिण भारतात परंपरेने चालत आलेली राजेशाही होती. यादवांचे, विजयनगरचे राज्य बुडाले होते. तेथे कोणी वारसदार नव्हते. अशा पृष्टभूमीवर शिवाजीराजांकडे विस्ताराचा विचार केल्यास साम्राज्यालाही लाजविणारा राज्यविस्तार होता, पण ते स्वत: अभिषिक्त राजे नव्हते. थोडक्यात, राज्य असूनही राजा नव्हते. परंपरेने त्यांना वडिलोपार्जित जहागिरीचे मोकासदार पद मिळाले होते.
रयतेलाही आपला स्वतंत्र राजा असावा ही भावनिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या गरज होती. या व अशाच अनेक कारणास्तव शिवाजीराजेंनी जिजाऊंच्या आदेशान्वये विधिवत राज्याभिषेक करुन घेऊन स्वतंत्र "राजे" होण्याचे जाहीर केले.
शिवराज्याभिषेकाने सतराव्या शतकात एक उत्तम व सार्वभौम साधन मावळ्यांच्या, रयतेच्या, स्वराज्याच्या, म्हणजेच छत्रपतींच्या हाती आले. भारतीय वन संस्था प्रमुख कार्यालयो डेहराडून येथे इंग्रजांनी १९३८ मध्ये स्थापन केली आहे. तेथे त्याकाळी एका भल्या मोठ्या लाकडी फळीवर इंग्रज प्रशासकांनी गेल्या एक हजार वर्षातील जगातील प्रमुख ऐतिहासिक घटनांची कोरीव नोंद केलेली आहे. त्यामध्ये भारतातील एकमेव घटना आहे. ती म्हणजे 'शिवराज्याभिषेक' होय. यावरून भारतीयांनी महत्व समजावे.
स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंनी दिलेल्या राजमुद्रेतील संदेशानुसार विश्ववंदनीय आणि विश्वबंधुत्व प्रत्यक्षात आणणारे स्वराज्य जन्मास आले होते. यावर शिक्कामोर्तब करण्याचा अर्थात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त ठरला ६ जून (१६७४ ) काशीहून गागाभट्ट यांना पौरोहित्य करण्यासाठी निमंत्रित करण्याच ठरलं, सर्व राजेरजवाडे, परदेशी वकिलाती, मानकरी, किल्लेदार ... सर्वांना निमंत्रण धाडली. राष्ट्रमाता जिजाऊ आणि संपुर्ण राजपरिवार, सरदार, रयत सोहळ्याच्या तयारीला लागली. २९ मे (१६७४ ) पासून विविध पूरक विधीस सुरुवात झाली. स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याच्या महाराणी सोयराबाई तर स्वराज्याचे युवराज संभाजीराजे यांना विधिवत अधिकाराची जाणीव दिली गेली.
अखेर तो सोनियाचा दिन उजाडला मंगलप्रहारी राजे गडाधिपती जगदीश्वरा चरणी नतमस्तक झाले. स्वराज्य प्रेरिका जिजाऊंच्या चरणांवर मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी मस्तकाभिषेक झाला. जिजाऊंना सोबत घेऊन शिवराय आणि शंभूराजे सिंहासनाकडे निघाले, जिजाऊंना आसनस्थ करून शिवराय सिंहासनाकडे निघाले या स्वराज्याच्या उभारणीत बलिदान दिलेल्या मावळ्यांच स्मरण करत करत ते सुमारे बत्तीस मण वजनाच्या (अंदाजे तेराशे किलो ) सिंहासनाजवळ आले, सिंहासनास मन:पूर्वक अभिवादन केले, सभामंडपातील जमलेल्या उपस्थितांना अभिवादन करून सिंहासनाधिष्ठित झाले.
मुख्य पुरोहित गागाभट्ट यांच्या सह इतरांनी मंत्रोच्चार सुरू करुन विधिवत राज्याभिषेक सोहळा संपन्न केले. शिवाजीराजे ६ जून १६७४ रोजी जगातील पहिले छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकारानी आसमंत दणाणून गेला. ठिकठिकाणच्या गडावर तोफांना बत्त्या दिल्या गेल्या मुलखातील रयत आऊट गोळे उडवून आपले राजे छत्रपती झाल्याचा आनंद साजरा केले.
एक सामान्य व्यक्ती स्वकौशल्य, स्वबळ आणि महत्त्वाकांक्षाच्या बळावर छत्रपती होवू शकतो हे जगाला दाखवून दिले. मोगल, आदिलशाही, कुतुबशाही, छत्रसाल, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांचे प्रतिनिधी व वकील यांच्या कडून शुभेच्छा भेट वस्तू देण्यात आले. त्यांना ही छत्रपतींकडून नजराणे भेट देण्यात आले.
या निमित्ताने जिजाऊंनी शिवराज्याभिषेकात कशाचीही उणीव राहू नये अशी सक्त ताकीद दिली होती. एवढेच नव्हे तर या सोहळ्यास जन्मभर बचत केलेल्या स्वत:च्या खात्यातील सुमारे तीस लाख होन नगद शिवरायांना भेट म्हणून दिले.
शिवछत्रपतींनी नवीन शकाची सुरुवात केली. शिवराज्याभिषेक शकानुसार स्वराज्याचा कारभार सुरू झाला. स्वराज्याचे पहिले मंत्रीमंडळ-अष्टप्रधान मंडळ व त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्याही सुपुर्द केले. 'शिवराई' चलन सुरू केले. राज्यव्यवहारकोश बनविली, नवीन कायदे व दंडनीती बनवली, अनेक नवीन धोरण जाहीर केले.
शिवराज्याभिषेकाचे वर्णन छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या संस्कृत ग्रंथ 'बुधभूषणम्' मधून असे केले आहे:
*आकर्णाटकदेशतो गिरीवरे सह्योपसह्ये परै:|*
*दुर्गाणि क्षितीपालनाय नृपते:यो बागलाणावधि ||*
*आकृष्णातट माससमुद्रमभित: कृत्वा कृर्ती दुर्गम |*
*दुर्गे रायरिसंज्ञके विजयते भूमिभृतामग्रणी:||*
अर्थ: - सह्याद्रीच्या कठीण अशा पर्वतरांगेपासून ते कर्नाटक देशपावतो जी दुर्गराशी आहे ती व बागलाणच्या सीमेपासून ते कृष्णानदीचे समूद्रास मिळणारे ठिकाण या प्रदेशातील अनेक दुर्ग काबीज करणारे पृथ्वीचे पालनकर्ते शिवनृपती होते. त्यांनी दुर्गम अशा रायरी किल्ल्यावर स्वत:स धरणीधराग्रणी घडवून 'राजाधिराज' हे नामाभिमान धारण केले.
शिवराज्याभिषेक हा व्यक्तिगत शिवाजी महाराजांचे महत्त्व वा महात्म्य जगभर पोचवण्यासाठी नव्हता तर होवू घातलेल्या रयतेच्या स्वराज्याच्या अधिकारासाठी होतं.
त्या काळी भारत खंडात निर्माण झालेल्या विविध राजकीय सत्तांची इतिहासात नोंद झालेली होतीच. बहुतांश राजसत्ता संस्थापक घराण्याच्या नावाने ओळखल्या जात असतं. उदा. गुलाम घराणे, खिलजी घराणे, यादव घराणे, बहामनी घराणे, मोगल घराणे, आदिलशाही.... या परंपरेप्रमाणे सन १६७४ मध्ये निर्माण झालेल्या या नवीन राजसत्तेचे नामकरण 'भोसले घराणे' वा भोसलेशाही' सहज झाले असते, तर ते स्वाभाविकही मानले गेले असते; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यास "स्वराज्य" हे नाव दिले.
तमाम देशवासीयांना आजच्या त्रिशतकोत्तरसुवर्ण (३५० व्या) शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा...!
- राम गायकवाड मराठा सेवा संघ सोलापूर.