पुणे : लोणावळ्यामधून एक दुर्दैवी घटना समोर आली असून वर्षाविहारासाठी गेलेले एकाच कुटुंबातील ०५ जण भुशी डॅम मध्ये वाहून गेले आहेत. मानवी हृदयाचा ठोका चुकवणारी ही ह्रदयद्रावक घटना रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ०५ जण अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असल्याचं दृकश्राव्यचित्रण सामाजिक माध्यमावर शेअर झालंय.
भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथे पुण्यातील सय्यद नगर भागातील अन्सारी कुटुंबीय वर्षाविहारासाठी गेले होते. ते पाण्यातून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते संकटात सापडले. काही मदत मिळण्याच्या आतच वा मदतीसाठी फेकलेले दोर त्यांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांच्यावर आस्मानी संकट कोसळले.
त्या कुटुंबातील ०५ जण वाहून गेले. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून त्याला ओळखलं जाते. हे पाणी भुशी धरणात येते, तिथे शोधकार्य सुरू आहे. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, बुडालेल्या व्यक्तींची तातडीने शोध मोहीम सुरु करण्यात आलीय. त्यामध्ये ३ जणांचे मृतदेह सापडले असून अन्य २ जण बेपत्ता असल्याचे पोलिसांकडून सांगितलं जातंय.
शाहिस्ता परवीन (वय-४०वर्ष), अमीन अन्सारी (वय -१३ वर्षे), मारिया अन्सारी (वय-६ वर्ष), हुमेरा अन्सारी (वय- ६वर्षे) आणि अदनान अन्सारी (वय -६ वर्षे) अशी बुडालेल्या व्यक्तींची नावे असल्याचं सांगण्यात आलंय.