बॅरिस्टर भोसले प्रशालेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कासेगांव/संजय पवार :
यंदाच्या शैक्षणिक वर्षात या शाळेत मुलींची संख्या सर्वाधिक आहे. इयत्ता दहावीच्या गुणवंतामध्ये आलेल्या सर्वच मुली आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये देशात पुरुषापेक्षा स्त्रिया मोठ्या हुद्द्यावर दिसतील, राष्ट्रमाता जिजाऊ तसेच क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेली स्त्री शिक्षण चळवळ इथं खऱ्या अर्थाने सार्थक ठरल्याचं प्रतिपादन बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ, कासेगांव संचलित,बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेचा ४२ वा वर्धापन दिन तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव चौगुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आण्णासाहेब भालशंकर,कासेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्रीशैल भोज, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शंकर दादा येणगुरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा प्रयोगशाळा परिचर रामहरी चौगुले, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष महादेव सोनटक्के, शालेय शिक्षण समिती सदस्य तस्लीम कारभारी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढेकळे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना, अण्णासाहेब भालशंकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये, शिक्षण हे वाघिणीचं दूध असून त्याचा वापर तलवारीच्या धारेप्रमाणे केला पाहिजे. दिव्याची वात आणि त्याचा प्रकाश जसं सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी स्वतः जळत राहून सर्वांना प्रकाश देतो, तसं दिलीपराव चौगुले यांनी शिक्षणाची गंगोत्री सर्व गावकऱ्यांपर्यंत आणून ज्ञानाचा भांडार उभं केलंय.
या यशवंत विद्यार्थ्यांमधून कोणी मोठे पदाधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, मंत्रालय, जिल्हाधिकारी, अशा अनेक पदांवर ग्रामीण भागातील मुले नक्कीच चमकतील, असा विश्वास ही भालशंकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक बोधीप्रकाश गायकवाड यांनी प्रशालेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली. संस्थेचे सचिव सच्चिदानंद चौगुले,पत्रकार शिवदास वाडकर, संजय पवार उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक काशिनाथ जंगलगी यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले. इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे देखील प्रशालेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कासेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, उद्योजक बालाजी चौगुले यांनी विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ह्यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक-प्राध्यापिका, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ साळुंखे यांनी केले तर हारूण तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.