सोलापूर : सध्या सोलापूर शहरांमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी काही मुले व मुली ग्रामीण भागातून व परगावाहून येत आहेत. सोलापुरात सध्या पावसाचे वातावरण असल्या कारणामुळे त्यांच्या मुक्कामाची सोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जवाहरलाल नेहरू वसतिगृहात करण्यात यावी, अशा मागणीचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्यामार्फत देण्यात आले.
पोलीस भरती प्रक्रियेच्या निमित्ताने सोलापूर शहरात आलेल्या अनेक उमेदवारांचे कोणी नातेवाईक नसल्यामुळे काही उमेदवार हे मैदानातच रात्र काढतात, पण सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे तसेच शहरात रोज पाऊस पडत असल्या कारणाने रात्री रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्ड परिसरातील हॉटेल्स अव्वा च्या सव्वा दर आकारतात, त्या उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना हॉटेल्समध्ये राहणे परवडत नाही, त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
सध्या जवाहरलाल नेहरू वसतिगृह हे रिकामे असून अशा उमेदवारांना नेहरू वसतिगृहमध्ये प्रवेश पत्र दाखवून तात्पुरत्या स्वरूपात पर्याय उपलब्ध करून रात्री ०९ ते सकाळी ०८ वाजेपर्यंत राहणे व बाथरूम सोय व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहरप्रमुख सिताराम बाबर, रोहन माने, संघटक रमेश चव्हाण, उपशहर प्रमुख फिरोज सय्यद, आप्पासाहेब लंगोटे, रविकांत शिनगारे, दक्षिण तालुकाध्यक्ष शेखर चौगुले आदी उपस्थित होते.