सोलापूर : नुकताच एच. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. संगमेश्वर महाविद्यालयातील कु. नेहा शंकरनारायना अय्यर या विद्यार्थीनीने बोर्ड परिक्षेत इतिहास विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून इतिहासच रचला. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. स्वामिनाथ कलशेट्टी, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रा.संजय जाधव, उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक प्रा. मल्लीनाथ साखरे, कला विभाग प्रमुख शिवशरण दुलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शुभेच्छा देताना प्रा. कलशेट्टी म्हणाले की, सोलापूरमधील संगमेश्वर च्या नेहाने सोलापूरचा इतिहास राज्यात रचला, कारण इतिहास विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवणारी ती पहिलीच विदयार्थीनी ठरली आहे. खऱ्या अर्थाने नेहा अय्यरने सोलापूरचे नाव उज्वल केलं आहे.
आजपर्यंत सोलापुरातून एकही विद्यार्थी बोर्डात इतिहास विषयात पैकीच्या पैकी मार्क घेत नव्हते, पण पुणेचा इतिहास अय्यरने मोडीत काढला, असे मत प्रा. कलशेट्टी यांनी मांडले. नेहा, भविष्यात क्लास वन अधिकारी बनून संगमेश्वरचे नाव उज्वल करशील, या शब्दात उपप्राचार्य कुंटे यांनी शुभेच्छा दिल्या.
चार हुतात्म्यांच्या नगरीतील नेहा अय्यर ने बार्डात नाव कमविलं, निश्चीतच स्पर्धा परिक्षेतून पुन्हा एकदा ती देशभरात सोलापूरचं नाव उज्वल करेल, अशा शब्दात सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रा. संजय जाधव यांनीही शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम संगमेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालयात पार पडला. अनेक शिक्षक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. नेहा हिचे मार्गदर्शक, इतिहास विषयाचे प्रा. शंकर कोमूलवार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.