Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषदेच्या शाळेत दिलं जाणार गुणवत्ता पूर्ण शिक्षण : मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष


आळणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश मेळावा उत्साहात साजरा

धाराशिव : जिल्ह्यातील आळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी, १५ जून रोजी २०२४-२५ नुतन शैक्षणिक सत्रास प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व सुविधा देऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाणार आहे, गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं अभिवचन दिले.

उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी प्राथमिक शिक्षण खूप महत्वाचे असून जीवनाच्या जडणघडणीत खूप महत्वाचे आहे. पहिली ते चौथी च्या वर्गातील मुलांना शिक्षकांनी अधिकाधिक लक्ष देऊन त्यांना घडवावे, असे सांगितले. 

अशोक पाटील यांनी सर्व शिक्षकांना नवीन शिक्षणिक वर्ष्याच्या सर्व विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शुभेच्या दिल्या. धाराशिव जिल्हा गुणवत्तेत अव्वल ठेवल्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत व मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन केले. 



प्रथम नवागत बालकांचे स्वागत सजवलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टरमधून बँड पथकाच्या तालात, विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून संबंध गावातून अतिशय उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. स्वागतासाठी शाळेमध्ये प्रवेशद्वारावर सुबक अशी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. 

क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर नवीन पहिलीत प्रवेश झालेल्या मुलांचे स्वागत जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष,शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील, शहापूरकर, कार्यक्रम अधिकारी ग्रामीण विकास यंत्रणा जि. प. धाराशिव, शिक्षण निरीक्षक सराफ यांच्या वतीने करण्यात आले.

नवगतांचे स्वागत करताना प्रत्येक प्रत्येक मुलाच्या पायाचे ठसे घेऊन मुलांना वर्गात प्रवेश दिला. त्यांना गुलाब पुष्प, चाॅकलेट तसेच चित्ररुपी छोटी पुस्तके देण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच जेवणाच्या वेळी मसाला पुलाव भात, जिलेबी चा मेनू तयार करण्यात आलेला होता. मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी प्रस्ताविकामध्ये या शाळेत सर्व शिक्षकांच्या मदतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते, यापुढेही सर्वाना गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाईल, असे सांगितले.

यावेळी केंद्र प्रमुख निलेश नागले, शेषराव राठोड, आळणी गावचे सरपंच प्रमोद काका वीर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयकुमार नांदे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्याम बापू लावंड, ग्रामपंचायत सदस्य विनोद मामा लावंड, अक्षय कदम, सुनील काळे, किरण कोळी, अंगद भांडेकर, चंद्रकांत राठोड, पद्माकर पाटील, अण्णासाहेब राऊत, मधुकर कोरे, ज्ञानेश्वर निंबाळकर, मनोज वीर, राजाराम राठोड, निलेश निंबाळकर, महेश वीर, महेश कुदळे, बालाजी यादव, सचिन खोबरे, शिवलिंग चौगुले, सौ. पूजा रामराजे पौळ, शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी, दिनेश पेठे, उत्तम काळे, श्रीमती वर्षा डोंगरे, श्रीमती सुनिता कराड ,श्रीमती मंजुषा नरवटे, श्रीमती सुलक्षणा ढगे, श्रीमती क्रांती मते, श्रीमती सत्यशीला म्हेत्रे ,श्रीमती राधाबाई वीर, हनुमंत माने आदी शिक्षक-शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.