Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक परिश्रमानंतरही शोध मोहीम अपूर्ण; सकाळी पुन्हा प्रारंभ


सोलापूर : मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं गावच्या नदीवरील पूलावरुन पाणी वाहू लागलं होतं. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी पाण्यात घातलेले तिघे जण दुचाकीसह वाहून गेले.  ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव राजकुमार रेड्डी अशी त्यांची नावे होती. त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले. ज्ञानेश्वर कदम याचा शोध घेत असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकानं दिवसभर अथक परिश्रम घेतले. गुरुवारी, सकाळपासून पुन्हा शोध मोहिमेस पुन्हा प्रारंभ होईल, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.


ज्ञानेश्वर कदम पाण्यात वाहून गेल्याचं समजताच गांवचे सरपंच यशपाल वाडकर, ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब चौगुले, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस फौजदार जाधव, सहाय्यक फौजदार बाणेवाले यांच्यासह अनेक जण गाव नदीवर सकाळपासून हजर होते. तालुका प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीम आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले होते. या टीम मधील जवानांनावाहून गेलेल्या तरुणाची दुचाकी दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या पुलापासून थोड्याच अंतरावर त्यांच्या गळाला लागली, मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीमच्या पथकाला शोध घेऊनही तो मिळून आला नाही.

    (बचाव पथकाच्या शोध कार्यात गळाला लागलेली हीच दुचाकी)

सूर्य मावळतीनंतर वाढू पाहत असलेला अंधार लक्षात घेता, शोध पथकाने त्या तरुणाच्या शोधात सकाळपासून सुरू केलेली मोहीम सुर्यास्तानंतर संधी प्रकाश संपू लागल्यावर थांबविण्यात आली. अखेरची माहिती हाती आली असता त्याचा शोध लागलेला नाही. नदीचे पाणी उतरलेले असून उद्या, गुरुवारी सकाळी ०७.३० वा. शोध कार्यास सुरुवात होईल,  असं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीमच्या पथकांना सांगितल्याचं सरपंच यशपाल वाडकर आणि तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितलंय.