सोलापूर : येथील जलकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हाट्सअँप मेसेज आधारे हरवलेल्या एका 'आज्जी' ना त्यांच्या नातलगापर्यंत पोहचवलंय. सोलापूर शहराजवळील बाळे भागातील विनय क्लिनिक परिसरात गेल्या तीन दिवसांपासून एक आज्जी निपचित बसून आहेत, असा मेसेज मुंबई ग्रुपवरून सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लोकांना दिसला. त्यात मेसेज पाठवणाऱ्याचे नाव,पत्ता,नंबर काहीही नव्हते.फक्त सोलापूर नाव वाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्ती जाधवांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शोध घेण्यास विनंती केली.
तो मेसेज भक्तींनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज लिहिणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. संभाजी ब्रिगेडचे श्रेयस माने यांच्यातर्फे मेसेज लिहिणारे बाळे भागातील दीपक करकी यांचा शोध लागला, अन् आज्जी त्यांच्याजवळ असल्याचे कळले. यासंबंधी आटपाडी पोलीस ठाणेत मिसिंग दाखल असल्याचे भक्तींना कळले. त्यानुसार हालचाली करून पूर्ण माहिती घेऊन सांगली जिल्हा, आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथून या आज्जीच्या नातवाला सोलापूरला बोलावून घेऊन त्यांची कागदोपत्री ओळख पटवून, आज्जीशी सविस्तर बोलून समजूत काढून आटपाडी पोलीस ठाणेला संपर्क करून सोलापूर येथे सापडलेल्या आज्जीना सुखरूप नातलगाच्या स्वाधीन केले. त्या पंढरपूर येथे दर्शनास आल्यावर दोन महिन्यापासून हरवलेल्या होत्या.
७२ तास बिस्किटे देऊन आज्जीची काळजी घेणारे, त्या बाबतीत मेसेज पाठवणारे दीपक करकी तसेच याकामी मदत केलेल्या प्रत्येकाचे भक्ती जाधव यांनी आभार व्यक्त केलंय. अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी ज्येष्ठ मंडळी हरवण्याचे अगर नातलगांचं त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे प्रकार वाढत चालले असल्यासंबंधी दुःख व्यक्त करून ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सतर्क राहण्याची विनंती केली आहे.