पंडित, गायकवाड, डॉ. अधाने, सांगळे यांच्यासह १२ मान्यवर पुरस्काराचे मानकरी
सोलापूर : मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवारी १६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मनोरमा साहित्य मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.
मनोरमा बँक साहित्य पुरस्कार :
लखनसिंह कटरे (गोंदिया), प्रा. डॉ. प्रमोद गोराडे (अमरावती), प्रा. आनंद मेणसे (बेळगांव), संग्राम गायकवाड (सोलापूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. १० हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मनोरमा मल्टिस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार :
यंदा सुजाता जाधव (ठाणे), डॉ. ललित अधाने (छत्रपती संभाजीनगर), डॉ. संदीप सांगळे (पुणे) यांना प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स.रा. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार सुनेत्रा पंडित (सोलापूर), प्रतापसिंह चव्हाण (बेळगाव), चित्रा क्षीरसागर (गोवा) यांना जाहीर झाला. विशेष पुरस्काराने अशोक समेळ (ठाणे), मधुरा वेलनकर-साटम (दादर) यांना गौरविण्यात येणार आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.