मोहोळ/यासीन आत्तार : मूळ शेतमालकांऐवजी बनावट लिहून देणार व्यक्ती उभी करुन बनावट कागदपत्रे सादर करुन खोटे कुलमुखत्यारपत्र दस्त बनवून शासनाची फसवणूक करण्यात आलीय. हा खळबळजनक प्रकार मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ऑक्टोबर 2013 ते एप्रिल 2022 दरम्यान घडलाय. याप्रकरणी दुय्यम निबंधक (श्रेणी-१) धनंजय गोरे यांनी मोहोळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केलीय. त्यानुसार एका महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीतामध्ये एका मयत व्यक्तीचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, लिहून देणार बनावट व्यक्तीसह सहा जणांनी संगणमत करून विकास जगन्नाथ साळुंखे व सुहास जगन्नाथ साळुंखे यांचे ऐवजी दुय्यम निबंधकांसमोर बनावट व्यक्ती उभी करून मौजे शेजबाभुळगांव येथील गट नं. 284/2/अ/1/ड यासी क्षेत्र 3 हे 03 आर व श्री. सुहास जगन्नाथ साळुंखे, यांचे गट नं.284/2/3/1/अ यासी क्षेत्र 1हे 62 आर व गट नं. 242/1/अ क्षेत्र 2 हे 02 और या मिळकतीसंबंधी श्रीमती अर्चना भाऊसाहेब पाटील यांनी सदरची मिळकत पुन्हा विकास साळुंखे व सुहास साळुंखे यांना परत हस्तांतरीत केली आहे.
तथापी कुलमुखत्यार पत्र दस्त क्र.3949, 3951, 3953 सन 2013 मध्ये ड्युप्लीकेट व्यक्ती उभी करुन दस्त नोंदणी केल्याचे निदर्शनास येते, म्हणून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे, ही बाब निदर्शनास आल्यावर दुय्यम निबंधक धनंजय गोरे यांनी सहा जणांविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल केलीय.
त्यानुसार मोहोळ पोलिसांनी, लिहून देणार बनावट व्यक्ती (रा. माहीत नाही), अर्चना भाऊसाहेब पाटील (रा.नेर आंबेडकर सार्देन फ्लॅट नं.501, प्लॉट नं. 477, अभ्युदया बिल्डिंग, रोड नं. 13 चेंबूर मुंबई), रत्नाकर गायकवाड (रा.गायकवाड वस्ती, मोहोळ ता. मोहोळ), नागेश खेला सातपुते (मयत रा. माहीत नाही), नामदेव अगनू बरकड (रा. नागनाथ गल्ली, मोहोळ) आणि दासू गेना साबळे (रा.नजिक पिंपरी, ता. मोहोळ) या आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम 420, 465, 467, 471, 34 सह भारतीय नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 अन्वये गुन्हा दाखल केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.