Type Here to Get Search Results !

वर्षा विहाराकरीता येणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याचे पोलिसांचं आवाहन


पुणे : लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षाविहाराकरीता येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेऊन वर्षाविहाराचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा. निर्जनस्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये, असं आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आलंय.

रविवारी, ३० जून २०२४ रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत अतिशय दुर्दवी घटना घडलीय. दुपारी ०३:०० वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील लियाकत अन्सारी व युनुस खान हे त्यांचे १७ ते १८ कुटुंब सदस्यासह वर्षाविहाराकरीता लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले असता, पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्यांचे कुटुंबातील एकुण १० जण जोरदार आलेल्या पाण्याचे प्रवाहात वाहुन गेले.

त्यापैकी ५ जणांना पाण्याचे प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आलंय, परंतु उर्वरीत ५ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी तिघांचे मृतदेह मिळून आले असून साहिस्ता लियाकत अन्सारी (वय-३७ वर्ष), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय-१३ वर्ष) आणि उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय-८ वर्ष सर्व रा. सय्यदनगर, पुणे) अशी त्यांची नांवे आहेत. 

तसेच पाण्याचे प्रवाहात वाहुन गेलेले अदनान अन्सारी व मारिया अन्सारी यांचा शिवदुर्ग मित्र मंडळ व आय. एन. शिवाजी यांच्या मदतीने शोध कार्य सुरु आहे. हा परिसर हा भारतीय रेल्वे विभाग व भारतीय वन खाते यांचे आखरित्यात असल्याने रेल्वे प्रशासन, वन विभाग व नगर पालिका यांचे मदतीने या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

.... आवाहन ....

पर्यटकांनी आपलं व आपल्या कुटुंबाचे जीवन घालू नये धोक्यात : लोणावळा शहर पोलीस स्टेशन

याद्वारे तमाम नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, लोणावळा, खंडाळा या भागात वर्षाविहारा करीता येणाऱ्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे या भागात वर्षाविहारा करीता येणारे पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावतीने करण्यात आलं आहे.