सोलापूर : येथील स्मार्ट बाजार मध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूबरोबर ऊसळ डब्बा खरेदी केलेल्या एका ग्राहकाच्या माथी बुरशीयुक्त ऊसळ मारण्यात आलीय. हा संतापजनक प्रकार रविवारी, २६ मे रोजी सकाळी घडलाय. त्या मॉलमधून खरेदी केलेल्या ऊसळीत बुरशी आढळली, त्यावर ग्राहकाने तक्रार केली असता, आमच्याकडे अशीच ऊसळ मिळते.ती सोलापुरातील मोठ-मोठ्या हॉटेलमध्येही जाते, असं त्या शॉपमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. हा प्रकार ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रताप असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सरदार पटेल नामक ग्राहक होटगी रोड, आसरा चौक परिसरातील स्मार्ट बझार मध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी गेले होते. त्यांनी एकूण खरेदी वस्तूमध्ये दोनशे ग्रॅम ऊसळचा डबा खरेदी केला. ते घरी आल्यावर त्यांनी ऊसळ चा डबा उघडून पाहिला असता, ऊसळमध्ये बुरशीबरोबर किडे आढळले. या प्रकारामुळे संतापलेल्या ग्राहकाने त्या बजारच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली.
कधीकाळी 'कर लो दुनिया मुठ्ठी में' हे स्लोगन घेऊन कम्युनिकेशनच्या क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या रिलायन्स परिवाराने अलीकडे देशाच्या अनेक मोठ्या शहरात स्मार्ट बझार उभे केलेले आहेत. आपला वेळ वाचण्याबरोबर कॉलिटीच्या वस्तू मिळतील, या भावनेने ग्राहकांचा ओढा अशा मॉलकडे अधिक आहे.
सोलापुरातील आसरा चौकात स्मार्ट बझार मॉल असून या मॉलमध्ये सरदार पटेल गेले होते, त्यांनी स्मार्ट बझार मध्ये खरेदी केलेल्या ऊसळमध्ये बुरशी अन् किडे आढळले. हा प्रकार त्या मॉलच्या व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असता, ग्राहकाच्या संतापाचा आलेख उंचावणारं उत्तर त्या व्यवस्थापकाने दिले.
व्यवस्थापक एवढ्यावरच न थांबता त्यानं सोलापूर शहरातील मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये हीच ऊसळ जाते, असं सांगून या बुरशीयुक्त ऊसळची गुणवत्ता पटवून देण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केलाय. बुरशीयुक्त ऊसळ विक्री करून स्मार्ट बझार नागरिकांच्या जीवाशी खेळतोय. अन्न व औषध प्रशासनाने स्मार्ट बाजार मॉलची तपासणी करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरदार पटेल, अमोल गोसावी यांनी दिलाय.