Type Here to Get Search Results !

भुमापक संतोष हंचे याच्याविरुध्द लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल


सोलापूर : अविभक्त हिस्सा खरेदीनंतर सदर मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावे कमी करून घेणाऱ्याचं नांव लागण्यासाठी खरेदीदारांकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी परिरक्षण भूमापक संतोष रामलिंग हंचे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं. अक्कलकोट भूमी अभिलेख कार्यालयात सोमवारी ही कारवाई करण्यात एसीबी पथकाला यश आलंय. लाचखाऊ भूमापक संतोष हंचे याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

अक्कलकोट येथील सि.स.नं.१६७७ व १६७८ मधील अविभक्त हिस्सा खरेदीनंतर त्यावर खरेदीदारांनी त्याचे नाव लावण्यासाठी अर्ज दिला होता. अर्जाच्या अनुषंगाने मालमत्ता पत्रकावरील मयत व्यक्तीचे नावावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ प्रमाणे नोटीस काढून व त्यांच्या वारसांच्या नावावर कलम २५८ प्रमाणे नोटिस काढून नमुद नावावर कंस करून त्याप्रमाणे फेरफार नोंदी घेण्यासाठी भुमी अभिलेख कार्यालय, अक्कलकोट येथील परिरक्षण भूमापक संतोष रामलिंग हंचे यांनी त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. यासंबंधी तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे सोमवारी, २७ मे रोजी प्राप्त झाली होती.

या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, यातील लोकसेवक संतोष रामलिंग हंचे यांनी तक्रारदार यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ प्रमाणे खरेदी दिलेल्यांच्या नावावर केस करून त्याप्रमाणे मालमत्ता पत्रकावर नोंदी घेण्यात आलेले आहेत, असे सांगून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम २५८ प्रमाणे मयत व्यक्तिचे नावावर कंस करून त्याप्रमाणे मालमत्ता पत्रकावर नोंद घेण्यासाठी प्रलंबित राहिलेल्या कामाकरीता तडजोडीवरून ३००० रूपये लाचेची मागणी केले. त्यानंतर सापळा कारवाईवेळी हंचे यांनी तक्रारदार यांच्याकडून ३ हजार रूपये लाच रक्कम स्वतः स्विकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे (लाप्रवि, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे पो.नि. चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार/किणगी, पोअं/हाटखिळे, चालक पोअं सुरवसे (सर्व नेमणुक : लाप्रवि, सोलापूर) यांनी पार पाडली.

..... आवाहन ......

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

संपर्क पत्ता : पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री. छत्रपती शिवाजी रंगभवन चौक, सोलापूर.

१. हेल्पलाईन टोल फ्रि क्रमांक - १०६४

२. अॅन्टी करप्शन ब्यूरो, सोलापूर दुरध्वनी क्रमांक :- ०२१७- २३१२६६८

३. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई :- ९९३०९९७७००

५. ई-मेलआयडी सोलापुर

dyspacbsolapur@gmail.com