सोलापूर : सांगोला तालुक्यातील घेरडी खांडेकर वस्ती येथे बैलगाडी शर्यतीच्या वादातून १५ ऑक्टोबर२०२२ रोजी झालेल्या गंगाराम गावडे खून प्रकरणी अटकेत असलेला आरोपी साहुबा बापू खांडेकर (रा. घेरडी) याने केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी ॲडी. सेशन्स जज्ज तोष्णीवाल यांचेसमोर होऊन न्यायाधिशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.
०९ एप्रिल २०२२ रोजी बैलगाडी शर्यतीत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दोन्ही गटात वैमनस्य आलेले होते. १५ ऑक्टोबर रोजी मयत गंगाराम गावडे, आपल्या कुटूंबियासह सांगोला येथे डॉ. अलदर यांच्या दवाखान्यात गेलेले होते. तेथून ते त्यांच्या कुटूंबियासह बोलेरो जिपमधून आपल्या घराकडे परत जात असताना आरोपी सुरेश मुत्यप्पा खांडेकर, सहदेव @ गौडा लक्ष्मण बंडगर, साहुबा बापू खांडेकर यांच्यासह चार जणांनी जिपगाडी रस्त्यात आडवी लावून येणारी जिप अडवली. त्यानंतर जिपमधून प्रवास करणाऱ्या गंगाराम गावडे यांच्यावर घातक शस्त्राने हल्ला केला. त्या प्राणघातक हल्ल्यात गंगाराम गावडे यांचा मृत्यू झाला.
यासंदर्भात गंगाराम गावडे यांचा मुलगा विजय गावडे यांनी सांगोला पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी साहुबा बापू खांडेकर यांनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जास सरकार पक्षातर्फे व मुळ फिर्यादीतर्फे प्रखर विरोध करण्यात आला. मूळ फिर्यादीतर्फे जामीन अर्जास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. न्यायाधिशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. सारंग वांगीकर, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड.जयदीप माने, ॲड. सिध्देश्वर खंडागळे, ॲड.सुहास कदम तर आरोपीतर्फे ॲड. गिरीष तपकीरे (सांगली) आणि ॲड. सतिश लेंडवे यांनी काम पाहिले.