Type Here to Get Search Results !

... वाहतुकीचा राजमार्ग अशी बनू पाहतेय जिल्ह्याची नवी ओळख; २८ लाखाचा गुटखा जप्त


सोलापूर : कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करून अक्कलकोटमार्गे भिवंडीला जात असलेला २८ लाख ४५ हजारांचा गुटखा पकडण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा येथे ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुटखा वाहतुकीचा राजमार्ग अशी जिल्ह्याची नवी ओळख बनू पाहतेय, असं या कारवाईनं जनमाणसांसमोर आलंय.

दरम्यान, नंदिनी सिद्धेश्वर हिरेमठ (वय ४०, अन्न सुरक्षा अधिकारी, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय गुरुनाथ राठोड (वय ४७, रा. नागनहळ्ळी, ता. अक्कलकोट), आकाश शरणाप्पा काडरामे (वय ४०, रा. माळी गल्ली, अक्कलकोट) व खाजाबाई अन्सारी (वय ३५, रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांच्याविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी, १६ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटमार्गे भिवंडीला टेम्पोतून गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सापळा लावला. गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित टेम्पोला थांबविण्यात आले. 

टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोत पीके असे लिहिलेल्या ०५ गोण्या व त्यात २ लाख २२ हजार ३०० तर गोल्ड असे लिहिलेल्या ५९ गोण्या त्याची किंमत २६ लाख २३ हजार १४० असा २८ लाख ४५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत गुटखा वाहतुकीत गुंतलेला टेम्पोही जप्त करण्यात आला. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, मावा इत्यादी प्रकारच्या वस्तूंचा साठा व वाहतूक करण्यावर बंदी असताना या आदेशाचे पालन न केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर खुलेआम गुटखा विक्री होते. हा सर्व गुटखा कर्नाटकातून येतो. गुटखा विक्री व वितरणाचे केंद्र म्हणून सोलापूर जिल्ह्याची नवी ओळख बनू पाहतेय, असं दिसतंय.