Type Here to Get Search Results !

' या ' कडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे बुधवारी लाक्षणिक उपोषण



सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी, वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी, तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा, मदत मिळावी, या पत्रकार सुरक्षा समितीच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर (आंदोलन गेट) बुधवारी, २२ मे रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिलीय.

यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, दिवाळी तसेच ०१ मे महाराष्ट्र  कामगार दिन अश्या वर्षातून चार वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रानां पाच हजार रुपयेप्रमाणे वीस हजार रुपये प्रति वर्ष जाहिराती मिळायच्या. २०१८ पासून राज्य सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंद केलं आहे. 

सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीची झाले आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खच खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकाना डी टी पी व छपाईचा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत. 

समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्रं सध्या दिशाहीन ठरत असून कागदाचे वाढलेले भाव व छपाईचा खर्च त्याचबरोबर शासन यादीवर नसलेल्या छोट्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी माना टाकल्या आहेत. राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृतीचे काम करत आहेत, परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरत आहे.

राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्राना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्रव्यवहार केला.  राज्य सरकारने यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वीप्रमाणे जाहिराती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने याकडे  राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवारी, २२ मे रोजी जिल्हा परिषदजवळ आंदोलन गेट या ठिकाणी सकाळी ११ वाजता उपोषण करण्यात येणार आहे.

या उपोषणास सोलापूर शहर व जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्रचे संपादक तसेच पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केलं आहे.