कोरवली गावाला वाळे भावंडांकडून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा
सोलापूर : गतवर्षी पावसानं पाठ फिरवल्यानं जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न भीषण बनलाय. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. माणसाहून अधिक दयनीय अवस्था मुक्या जित्राबांची आहे. अशा संकटाच्या काळात समाजातील सज्जन माणसं माणुसकीच्या नात्यातून दोन पावलं पुढे येतात. कोरवलीच्या वाळे भावंडांनी स्वतःच्या शेतातील सहा एकर ऊस पिकाचे पाणी तोडून ग्रामस्थांच्या घशाला ओलावा देण्यासाठी केलेले प्रयत्न शब्दात वर्णन होण्याहून मोठे असल्याचे दिसून येतंय.
मोहोळ तालुक्यातील अनेक गावात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे पाणीटंचाईची खूपच समस्या निर्माण झाल्याने गावातील नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत होतं.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेल व विहीर कोरडी पडल्याने गावात पाणी समस्या निर्माण झाली होती. पाण्यासाठी गावातील नागरिकांना व महिलांना पहाटेपासूनच रांग लावावी लागत होती. गावातील नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत होती.
गावकरी मिळेल तेथून पाणी आणून स्वतःबरोबर मुक्या जनावरांची तहान भागविण्याची कसरत करीत होते, हीच गैरसोय लक्षात घेऊन गावातील पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध वाळे व त्यांचे बंधू धनंजय वाळे या बंधूंनी कै.अमोगसिद्ध वाळे व कै.श्रीशैल वाळे यांच्या स्मरणार्थ स्वतःच्या बोरवेल व विहिरीतून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा गावात सुरू केला आहे. यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा आहे.
जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या कोरवली पाणीपुरवठा करणारी विहीर, बोअरवेल कोरडी पडल्याने सध्या पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत वाळे कुटुंबीयाने सामाजिक बांधिलकी जोपासत सहा एकर ऊस शेतीचे पाणी बंद करून गावाची तहान भागवण्यासाठी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
आजच्या दुष्काळी परिस्थितीत गावाला जलदूत म्हणून धावून आल्याने वाळे भावंडांचं सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील तरुण तानाजी डिगे आणि अमोगसिद्ध कोळी हे मोफत ट्रॅक्टर चालवून त्यांच्या कार्यात या कार्यात सहकार्याच्या भावनेतून खारीचं योगदान देत आहेत.