पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गावकर यांचं उद्धट वर्तन
सोलापूर : मालाड-कुरार पोलीस ठाण्याचे जबाबदार पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गावकर यांनी बंदोबस्त वाटप दरम्यान हजर असलेल्या होमगार्ड व होमगार्ड अधिकाऱ्यांच्या आई-बहीणींचा उध्दार केलाय. हा खळबळजनक तितकाच संतापजनक प्रकार मुंबईत घडलाय. या घटनेवर जिल्ह्यात आलेल्या होमगार्डनी त्यांचे शल्य व्यक्त केलंय. होमगार्ड व होमगार्ड अधिकाऱ्यांना शिवीगाळी-अरेरावीची भाषा करीत उद्धट वर्तन केलेल्या बाळकृष्ण गावकरावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होमगार्ड व होमगार्ड अधिकाऱ्यांनी राज्याच्या गृहमंत्र्याकडे एका निवेदनाद्वारे केलीय.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात राज्याच्या राजधानी मुंबईत मताधिकाराची प्रक्रिया पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगाकडून निश्चित झाले होते. ही निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यातून पोलीस अधिकारी-कर्मचारी नेमले जातात, त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड व होमगार्ड अधिकारी मुंबईस गेले होते.
कर्तव्यावर असताना निष्काम भावनेने समाजाची सेवा करणारा वर्ग म्हणून होमगार्डकडं पाहिलं जाते. सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड व होमगार्ड अधिकारी मालाड-कुरार पोलीस स्टेशन येथे लोकसभा निवडणूक बंदोबस्ताकरिता आले असताना रविवारी, १९ मे रोजी बंदोबस्त वाटपादरम्यान एकत्र आलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना व अधिकाऱ्यांना मालाड-कुरार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाळकृष्ण गावकर यांनी शिवीगाळ करून उद्धटपणाचे वर्तन केले. हा प्रकार होमगार्डच्या मनोबल खच्चीकरण करण्याचाही प्रकार असल्याचे काहींनी बोलून दाखवलंय.
पोलीस उपनिरीक्षक गावकर यांच्या बेजबाबदार आणि उद्धट वर्तन केल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, गृह रक्षक दलाचे महासमादेशक, पोलीस आयुक्त - मुंबई, मा.पोलीस निरीक्षक, मालाड-कुरार पोलीस स्टेशन, जिल्हा समादेशक होमगार्ड, बृहन्मुंबई, जिल्हा समादेशक होमगार्ड, सोलापूर आणि ठाणे अंमलदार - कुरार पोलीस ठाणे, मुंबई यांना मंगळवारी पाठवण्यात तसेच देण्यात आलंय.